अहिल्यानगर जिल्हा प्रतिनीधी / वसंत रांधवण : आपल्या दोन भावजयींचा निर्घृणपणे खून करणार्या माथेफिरू खुन्याला अखेर अकोले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बेलापूर बदगी येथे सोमवारी दत्तात्रय फापाळे याने शेती व पैशाच्या किरकोळ वादातून आपली सख्खी भावजय उज्ज्वला अशोक फापाळे (वय 30) हिचा कोयत्याने सपासप वार करीत खून केला. यावेळी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणार्या वैशाली संदीप फापाळे (वय 40) या आपल्या दुसर्या भावजयीचाही रागाच्या भरात तशाच पदधतीने खून केला आणि दोघीजणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या.
घटनेनंतर आरोपी दत्तात्रय फापाळे तेथून पसार झाला होता. हातात कोयता घेतलेल्या स्थितीत जात असताना तो सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दरम्यान, या घटनेचे वृत्त समजताच अकोलेचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे हेही दाखल झाले. मग, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. तातडीने आरोपीचा शोध सुरू केला. मात्र रात्रीची वेळ, डोंगर व जंगल परिसर असल्यामुळे त्याला पकडण्यात अडचणी येत होत्या.
अखेर त्याला 17 तासानंतर पठारभागातील भोजदरी येथील डोंगरावर सकाळी पाठलाग करत पकडण्यात पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, उपनिरीक्षक खांडबहाले, पोहेकॉ. बडे, किशोर तळपे, सुहास गोरे, महेंद्र गुंजाळ, राहुल घोलप, पोना.पटेकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व उपविभागीय पोलीस अधिकार्यांचे पथक यांना यश आले. आरोपीस अकोले येथे आणण्यात आले.
याप्रकरणी शहाजी रखमा शिंगोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्ता उर्फ बापू प्रकाश फापाळे याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 103 (1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यास अटक केली असून कसून चौकशी सुरू केली आहे. त्यास बुधवारी नायायालयासमोर हजर केले जाणार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे हे करत आहेत. दरम्यान दोन्हीही महिलांवर बेलापूर येथे शोकाकूल वातावरणात मंगळवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात होता.
Leave a reply