राहूरी : जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक उपमुख्य कार्यकारी अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या वांबोरी येथील घरी चोरी झाल्याची घटना घडली आहे. समर्थ शेवाळे यांचे आई-वडील हे दोघेही सेवानिवृत्त शिक्षक आहेत. ते वांबोरी येथे सुभाषनगर भागात देहेरे रस्त्यालगत राहतात. सोमवार दि. 19 मे रोजी रात्री मुलीकडे एका कार्यक्रमानिमित्त नगरला गेले होते. या संधीचा फायदा घेऊन रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गेटचे व घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. साहित्याची उचकापाचक केली. चोरी केल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेर्याचा डीव्हीआर चोरटे बरोबर घेऊन गेले.
सुमारे 10 तोळे दागिने व दीड लाख रुपये रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले आहेत. रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान सहा चोरट्यांनी दोन दोन दुचाकीवर येऊन घरात प्रवेश केला. त्यावेळी एक चोरटा बाहेर दुचाकीजवळच थांबला होता व पाच जणांनी कुलुप तोडून आत मध्ये जाऊन सर्व कपाटे, भांडे उचकून दहा तोळे सोने व दीड लाख रुपये रोख रक्कम त्यांच्या हाती लागला.
याचवेळी सुभाषनगर येथे राहणारे दोन तरूण गावातून रात्री साडेबाराच्या दरम्यान घरी चालले होते. घरी जात असताना त्यांना शेवाळे यांच्या घरासमोर एकजण दिसल्याने त्यांनी विचारपूस केली असता त्या चोरट्याने आतील चोरट्यांना आवाज दिला व ते सर्वजण बाहेर आले. त्यातील एकाने गावठी कट्टा काढून तुम्ही इथून जा, नाहीतर तुम्हाला गोळ्या घालू, अशी धमकी दिली.हे दोन तरूण घाबरून तेथून निघून गेले. दरम्यान चोरट्यांनी दुचाकीवरून वांबोरीकडे धुम ठोकली. घटनेच्या ठिकाणी ज्येष्ठ नेते अॅड. सुभाष पाटील यांनी भेट देवून या घटनेचा ताबडतोब तपास लावण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
राहुरीचे पो. नि. संजय ठेंगे, उपनिरीक्षक समाधान फडवळ तसेच डॉग स्कॉड व फिंगरप्रिंटचे अधिकारी, वांबोरीचे पो. कॉ. आदिनाथ पालवे, वाल्मिक पारधी व निकम यांनी येऊन घटनेच्या सर्व माहिती घेतली. वांबोरी परिसरामध्ये अनेक चोर्याच्या घटना घडत आहे. पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे पोलिसांची गस्त बंद आहे. ही गस्त पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वांबोरी येथे पालकमंत्री विखे पाटील यांच्या स्विय सहाय्यकाच्या घरी धाडसी चोरी, दहा तोळे सोने व दीड लाख रुपये रक्कम लंपास

0Share
Leave a reply