राहुरी प्रतिनीधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील मानोरी परिसरात एका १२ वर्षीय मुलीचा पतंग उडवताना विहीरीत पडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज दि. १० जानेवारी रोजी सकाळच्या दरम्यान घडली. नेपाळ येथील एक कुटुंब राहुरी तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायत हद्दीत खिळे वस्ती रोड परिसरात राहत आहे. याच कुटुंबातील बिनीता बिष्णू थापा ही १२ वर्षाची मुलगी पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत होती. आज दि. १० जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजेदरम्यान ती मुलगी इतर मुलांबरोबर आपल्या घराजवळ पतंग उडवीत होती. पतंग उडवीत असताना ती मुलगी तेथे असलेल्या एका विहीरीत पडली. आणि पाण्यात बुडू लागली. तेव्हा इतर मुलांनी आरडाओरडा केला. त्यावेळी परिसरातील सर्जेराव जाधव, तुषार बाचकर यांनी ताबडतोब धाव घेऊन विहीरीत उड्या मारल्या आणि पाण्यात बुडालेल्या मुलीचा शोध घेतला.
त्यानंतर मुलीला दोरीने बांधून विहीरीतून बाहेर काढण्यात आले.रुग्णवाहिका चालकांनी तीला तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तीला तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले. यावेळी मयत बिनीता या मुलीच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
राहुरी तालुक्यातील मानोरी परिसरात पतंग उडवताना विहिरीत पडून १२ वर्षीय मुलीचा दुदैवी मृत्यू

0Share