अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी / वसंत रांधवण : पाथर्डी तालुक्यातील परीक्षा केंद्रावर नायब तहसीलदाराला कॉपी पुरवताना रंगेहाथ पकडले आहे. अनिल तोडमल असे या रंगेहाथ पकडलेल्या नायब तहसिलदारांचे नाव असल्याचे माहिती समोर आली आहे. आता शिक्षकांप्रमाणे नायब तहसीलदारावर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बारावी बोर्ड परीक्षेमध्ये स्वतःच्या पाल्यालाच कॉपी पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे. पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी परीक्षा केंद्रावर ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. संबंधित नायब तहसिलदारांवर नेमकी काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यंदा बोर्डाच्या परीक्षा कॉपी मुक्त वातावरणामध्ये घेता याव्यात म्हणून कठोर नियमावली राबवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी. तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा, असे आदेश दिले आहेत. पण आता नायब तहसीलदार आपल्या पाल्याला कॉपी पुरवताना रंगेहाथ पकडल्या गेल्याने त्यांच्यावर काय कारवाई होणार? शिक्षकांसारखे त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बोर्ड परीक्षेच्या परीक्षा केंद्र भागात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 ची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, परीक्षा केंद्रावर व 100 मीटर परिसरात अनाधिकृत व्यक्तींना पूर्ण प्रतिबंध घालण्यात यावा, परीक्षा केंद्रात प्रवेश देतांना विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे कॉपी करण्याचे साहित्य (पुस्तके, नोटस्, मोबाईल) जवळ ठेवणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. भरारी पथकाव्दारे कॉपी मुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणी अपेक्षित असल्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले होते.
पाथर्डी येथे मुलाला कॉपी पुरवताना नायब तहसीलदार ताब्यात : शासनाचे कॉपी पुरवणाऱ्यांवर बडतर्फीचे आदेश नायब तहसीलदाराला बडतर्फ करणार का ?

0Share
Leave a reply