Disha Shakti

Uncategorized

समाजाला आपण देणे लागतो ही भावना कायम मनामध्ये जागृत ठेवा – विस्तार शिक्षण संचालक डॉ.गोरक्ष ससाणे

Spread the love

राहुरी विद्यापीठ / आर आर जाधव : महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. यामुळे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्राची फी, मेसचा खर्च इ. आवश्यक गोष्टींसाठी लागणारा खर्च करणेसुध्दा शक्य होत नाही. अशा या हुशार व होतकरु विद्यार्थ्यांना जॉन डिअरच्या माध्यमातून ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानसारख्या संस्था समाजकार्याच्या भावनेने शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मदत करतात, ही फार महत्वाची बाब आहे. अशा वेळी ही शिष्यवृत्ती घेवून शिक्षण पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांनी आपणही या समाजाचे काही देणे लागतो ही भावना कायम मनामध्ये जागृत ठेवली पाहिजे, त्याप्रमाणे आचरण केले पाहिजे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जॉन डिअर, पुणे व ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात शिष्यवृत्ती पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. गोरक्ष ससाणे बोलत होते. यावेळी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रविंद्र बनसोड, जॉन डिअर कंपनीचे आर्थिक विभाग प्रमुख महेश पाटणकर, कंपनीच्या सामाजीक संशोधन शाखेचे रविंद्र कासार, कंपनीचे उत्पादन मार्केट विभाग प्रमुख रोहन जगदाळे, कृषि यंत्रे व शक्ती विभाग प्रमुख डॉ. सचिन नलावडे व ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त प्रशांत सुडे उपस्थित होते.

यावेळी डॉ. रविंद्र बनसोड आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की शिष्यवृत्ती मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करुन आपले भविष्य घडवावे. तुम्ही भविष्यात येणार्या समस्येला यशामध्ये परावर्तीत करा असा मोलाचा संदेश त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. रोहन जगदाळे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की तुम्हाला मिळालेल्या संधीचा फायदा तुम्ही घेतला नाही तर तुम्ही जिंकण्याच्या स्पर्धेतून बाहेर पडाल. तुम्ही कधीही स्वतःला इतरांपेक्षा कमी समजू नका. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यास यश नक्कीच मिळेल. यश मिळाल्यानंतर तुम्ही देणार्यांच्या भुमिकेत सामिल व्हा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

रविंद्र कासार आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की गरिबी, भुक व शिक्षण यासारख्या महत्वाच्या घटकांना समोर ठेवून समाजकार्य करण्याचा आमच्या कंपनीचा प्रयत्न आहे. पर्यावरणाची स्वच्छता तसेच पिण्याचे पाणी यासारख्या महत्वाच्या असणार्या विषयांवरदेखील आम्ही सामाजीक कार्य करणार्या इतर संघटनांसोबत काम करतो. या ठिकाणी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आम्हाला काम करता आले याचे मोठे समाधान आहे. महेश पाटणकर यावेळी म्हणाले की समाजातील पुढची एक चांगली पिढी घडविण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. अशा प्रकारच्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा आमचा प्रयत्न राहील.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्रशांत सुडे म्हणाले की या सिडींग टॅलेंट शिष्यवृत्तीच्या माध्यमातून जॉन डिअर कंपनीच्या सहकार्याने आम्ही आमचे सामाजिक उत्तरदायित्व पार पाडत आहोत. ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान भविष्यातही अशा प्रकारचे कार्यक्रम राबवून जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना आम्ही मदत करत राहू. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये आचार्य पदवीचे चार, पदव्युत्तरचे 25 व पदवीच्या 16 विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी शिष्यवृत्ती प्राप्त दिलीप रणदिवे, सपना मगर, श्रध्दानंद धबदुले व अंजली देशमुख या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी या शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांच्या निवड चाचणी प्रक्रियेत सहभागी असणार्या डॉ. विजय पाटील, डॉ. सुनील भणगे, डॉ. बी.एम. भालेराव, डॉ. भाईदास देवरे, डॉ. सुनील फुलसावंगे, डॉ. बाबासाहेब भिंगारदे, डॉ. अधिर आहेर, डॉ. विलास साळवे, तमनर, श्रीमती स्वाती शिंदे व ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानचे अभय घाडगे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील फुलसावंगे यांनी तर आभार श्रमिक प्रतिष्ठानचे कार्यक्रम व्यवस्थापक सत्यजीत गुरव यांनी मानले. या कार्यक्रमासाठी ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच विद्यापीठातील कृषि प्रक्रिया अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख डॉ. कैलास कांबळे, प्राध्यापक, कर्मचारी व शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी विद्यार्थ्यानी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!