बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार कासराळीकर : उन्हाच्या पारा वाढल्यामुळे नागरिकांना आता थंड पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे.सालाबादप्रमाणे ‘गरिबांचा फ्रिज’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या माठाचे बाजारात आगमन झाले आहे. माठाचा वापर हा पर्यावरणासाठीही चांगला आहे, कारण तो नैसर्गिकरित्या थंड पाणी ठेवतो आणि त्यात प्लास्टिकचा वापर होत नाही. मात्र, माठासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने यंदा माठाच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेने साधारण वाढ झाली आहे.
बिलोली बाजारा मध्ये लहान-मोठ्या आकारातील लाल, काळ्या रंगाचे माठ, रांजण आणि नळ लावलेले माठ 150 रुपये ते 700 रूपये किंमतीचे माठ बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. त्यातच उन्हाचा कडाका वाढल्याने माठांची मोठ्या प्रमाणावर विक्री घेणे अपेक्षित होते पण नागरिकांतून हवी तशी मागणी होत नाही. व्यवसाय करणे अवघड झाले आहे. माठ खरेदी करताना ग्राहक काहीही भाव करतात. सांगितलेल्या दरापेक्षा निम्म्या दरात माठ खरेदी करण्याची अपेक्षा ठेवतात. माठ बनवण्यासाठी करावी लागणारी मेहनत व खर्च पाहता आता व्यावसायिक दृष्टिकोनातून माठ बनविणे आज परवडण्यासारखे नाही. तरुण पिढीला या व्यवसायाच्या आकर्षण नाही
त्यामुळे हा व्यवसाय परवडेनासा झाला आहे. मात्र, पर्याय नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी हा पारंपरिक उद्योग आम्हाला करावाच लागत आहे. त्यातच आज काल गरिबांच्या घरातही इलेक्ट्रॉनिक फ्रिज आढळून येतो. त्यामुळे साहजिकच आमच्या व्यवसायावर परिणाम होतो, अशी खंतही कुंभार बांधवांनी व्यक्त केली.
Leave a reply