Disha Shakti

Uncategorized

महात्मा फुले कृषि विद्यापीठात 63 वा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

Spread the love

महात्मा फुले कृषि विद्यापीठाची सर्व क्षेत्रात दमदार वाटचाल-कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

प्रतिनिधी / प्रमोद डफळ: राहुरी विद्यापीठ, दि. 1 मे, 2023 असंख्य लोकांच्या आंदोलनातून, प्रचंड खडतर प्रयत्नांमधून व 107 लोकांच्या बलिदानातून महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. आपना सर्वांना त्या शहिदांविषयी, महाराष्ट्राविषयी अभिमान असला पाहिजे. त्याचबरोबर देशाच्या विकासात कामगारांचाही सहभाग फार मोठा आहे म्हणुन आजचा दिवस कामगार दिवस म्हणुनही साजरा केला जातो. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यामध्ये मोठे योगदान दिलेले आहे. शेतकर्यांसाठी शिफारशी बरोबरच प्रत्येक पिकांचे नवनविन वाण तसेच शिक्षणासाठी परदेशी विद्यापीठांबरोबर सामंजस्य करार केलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेणे शक्य झाले आहे. कास्ट प्रकल्प, सेंद्रिय शेती, देशी गाय प्रकल्प यासह अनेक प्रकल्पांसाठी शास्त्रज्ञांनी मोठे योगदान दिले आहे.

विस्तार कार्य प्रभावी होण्यासाठी विद्यापीठ लवकरच कम्युनिटी रेडिओ सुरु करीत असून त्यामुळे विद्यापीठाचे संशोधन प्रभावी पध्दतीने शेतकर्यांपर्यंत पोहचणार आहे. अशा पध्दतीने विद्यापीठ सर्व क्षेत्रात दमदार वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठात 63 वा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, अधिष्ठाता डॉ. बापुसाहेब भाकरे, कुलसचिव श्री. प्रमोद लहाळे, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, कुलगुरुंचे विशेष कार्याधिकारी डॉ. महानंद माने व विद्यापीठ अभियंता श्री. मिलींद ढोके उपस्थित होते. या प्रसंगी विविध विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी आणि कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरक्षा अधिकारी श्री. गोरक्षनाथ शेटे व एन.सी.सी. अधिकारी डॉ. सुनिल फुलसावंगे यांनी केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!