Disha Shakti

क्राईम

हेरंब कुलकर्णींवर हल्ल्या करण्यासाठी 10 हजारांची सुपारी ; अटकेतील दोघांना दोन दिवस कोठडी

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते-साहित्यिक व येथील सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब रामचंद्र कुलकर्णी यांच्यावर हल्ला करण्यासाठी या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार अक्षय विष्णू सब्बन याने पसार असलेल्या सनी जगधने याला 10 हजार रुपयांची सुपारी दिली असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. अक्षय पोलिसांच्या ताब्यात असून जगधनेसह त्याचा पंटर पसार आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे. त्यांना अटक केल्यानंतर या गुन्ह्यासंदर्भात आणखी उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्ती केली आहे.

दरम्यान, सोमवारी रात्री अटक केलेल्या अक्षय सब्बन व चैतन्य सुनील सुडके यांना न्यायालयाने दोन दिवसांची (12 ऑक्टोबरपर्यंत) पोलीस कोठडी दिली आहे. गुन्ह्यात सहभागी असलेल्या एका अल्पवयीन मुलाची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.साहित्यिक कुलकर्णी यांच्यावर शनिवारी (दि. 7) दुपारी साडे बाराच्या सुमारास सावेडीतील प्रेमदान हाडको परिसरात लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला.

यावेळी त्यांच्यासमवेत असलेले सहकारी शिक्षक सुनील कुलकर्णी यांनाही मारहाण झाली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात कुलकर्णी यांनी शनिवारीच गुन्हा दाखल केला. मात्र पोलिसांनी याकडे तब्बल दोन दिवस दुर्लक्ष केले.अखेर सोमवारी राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला. थेट मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. खासदार सुप्रिया सुळे यांनी कुलकर्णी यांच्या घरी भेट दिल्यानंतर पोलीस यंत्रणेला जाग आली.

अधीक्षक राकेश ओला यांनी दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काही तासांतच हल्लेखोरांचा शोध घेऊन तिघांना नगर शहरातून ताब्यात घेतले. अक्षय विष्णू सब्बन (वय 30 रा. दातरंगे मळा), चैतन्य सुनील सुडके (वय 19 रा. बालिकाश्रम रस्ता) व एक अल्पवयीन मुलगा यांचा त्यामध्ये सहभाग आहे. एलसीबी पथकाने नगर शहरातील कोंड्यामामा चौक परिसरात सिनेस्टाईल पाठलाग करून मारहाण करणार्‍यांना पकडले व तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यातील दोघांना अटक करून मंगळवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले.

तपासी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक मोरे यांनी न्यायालयासमोर पोलीस कोठडीची मागणी करताना गुन्ह्यातील पसार दोघांचा शोध घ्यायचा आहे, गुन्ह्याचा उद्देश शोधायचा आहे, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, रॉड जप्त करायचा असल्याचे सांगितले. न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!