विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : नगर शहरातील बन्सी महाराज मिठाईवाले दुकानाचे चालक धीरज मदनलाल जोशी (वय ५१) यांच्यावर शनिवारी रात्री जीवघेणा हल्ला झाला. जोशी दुकानातून घरी परतत असताना घराच्या जवळच दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हल्ला केला. जोशी यांच्या डोक्याला मार लागला असून झटापटीत हल्लेखोरांची तलवार आणि गावठी कट्टा घटनास्थळीच पडला.
हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून जखमी जोशी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. जोशी यांचा राजकारणाशी संबंध नाही. त्यांचा केवळ मिठाईचा व्यावसाय आहे. हल्लेखोरांनी हल्ला करण्यापूर्वी त्यांना शिव्या दिल्याचे सांगण्यात येते. मात्र, हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी रात्रीच जोशी यांची भेट घेतली आणि पोलिसांकडे जलदगतीने तपासाची मागणी केली.
नगरच्या सावेडी उपनगरातील गुलमोहर रोडवर बन्सी महाराज मिठाईवाले हे मिठाईचे दुकान आहे. त्याचे संचालक धीरज जोशी काल रात्री काम संपवून जवळच असलेल्या किर्लोस्कर कॉलनीमधील आपल्या घरी परतत होते. घराच्या जवळ जातातच तेथे आलेल्या दोघा दुचाकीस्वारांनी त्यांच्यावर हल्ला केला. एकाच्या हातात तलवार होती. त्याने जोशी यांना शिवीगाळ करीत डोक्यात वार केले. त्यावेळी जोशी यांनी त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. या गडबडीत हल्लेखोर अंधारात पळून गेले. मात्र झटापटीत त्यांच्याकडील तलवार आणि गावठी कट्टा तेथेच पडला
याची माहिती मिळाल्यानंतर तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी आले. जोशी यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमदार संग्राम जगताप यांनीही तेथे धाव घेतली. शहरातील खून मारामाऱ्याचे वाढत्या प्रकाराबद्दल जगताप यांनी पोलिसांना जाब विचारला. शहरात बेकायदा शस्त्रे कोठून येतात? याचा छडा लावण्याची मागणी त्यांनी केली. जोशी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली.
Leave a reply