विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : नगर अर्बन बँकेच्या ठेविदारांसाठी एक महत्वाची बातमी आलेली असून सद्य परिस्थितीत या गैरव्यवहाराचा तपास करणारे आर्थिक गुन्हे शाखेचे कर्तव्यदक्ष अधिकारी संदीप मिटके यांची पुन्हा सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून नाशिक इथे बदली करण्यात आली आहे. नगर अर्बन बँकेच्या गैरव्यवहाराचा तपास सुरू झाला की अवघ्या काही दिवसात अधिकाऱ्यांची बदली होते असा विलक्षण योगायोग ?आतापर्यंत तरी दिसून येत आहे. न्यायालयाने निर्देश दिले तरच पोलीस यंत्रणा हलते आणि पोलीस यंत्रणा हलली की त्या अधिकाऱ्याची बदली होते असे आतापर्यंत दिसून येत आहे.
आज दिनांक 28 फेब्रुवारी रोजी गृहशाखेकडून काढण्यात आलेल्या आदेशाप्रमाणे तपासी अधिकारी अर्थात जिल्हा पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांची नाशिकला बदली करण्यात आलेली आहे.कर्तव्यदक्ष अधिकारी व आपल्या आक्रमक कार्यशैलीसाठी व गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरलेले जिल्ह्याला परिचित असलेले संदीप मिटके यांची आर्थिक गुन्हे शाखेत नेमणूक झाल्यानंतर ठेवीदारांमध्ये ठेवी परत मिळणेविषयी आशा पल्लवित झालेल्या होत्या मात्र संदीप मिटके यांची बदली झाल्यानंतर या पाठीमागे असलेल्या राजकीय दबावाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे.
नगर अर्बन बँकेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आरोपी असलेला सीए विजय मर्दा याच्यासोबत इतर आरोपींचे पासपोर्ट जप्त करण्याची मागणी ठेवीदारांनी अनेकदा केली होती मात्र आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेळेत कारवाई केली नाही त्यामुळे सीए असलेला विजय मर्दा हा सध्या शहरातून गायब झालेला असून इतरही आरोपी गायब होण्याची शक्यता ठेवीदारांनी याआधीच वर्तवलेली आहे. सीए विजय मर्दा याच्या विरोधात पोलिसांनी सध्या लुकआऊट नोटीस देखील जारी केलेली आहे विजय मर्दा यास अटक केल्यानंतर घोटाळा कसा आणि कुठे कशा कशा पद्धतीने झाला कोणी पैसे कसे फिरवले हे सर्व काही समोर येणार असून विजय मर्दा हा विमानतळ , समुद्रमार्ग किंवा नेपाळ मार्गे जाऊन इतर देशात पळून जाण्याची दाट शक्यता आहे. नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणात आत्तापर्यंत 105 आरोपींची नावे समाविष्ट असून त्यामध्ये विजय मर्दा याचा देखील समावेश आहे. आरोपी मर्दा हा आरोपी इतर आरोपींच्या मालमत्तेमध्ये भागीदार असल्याचे देखील समोर आलेले असून शहर सहकारी बँक घोटाळ्यात देखील विजय मर्दा हा आरोपी आहे.
नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला त्यावेळी सुरुवातीला दीडशे कोटींचा घोटाळा होता मात्र फॉरेन्सिक ऑडिटमध्ये हा घोटाळा 291 कोटींचा असल्याचे समोर आले. नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणात ज्या कुठल्या अधिकाऱ्याने आरोपींवर हात टाकण्याचा प्रयत्न केला त्या अधिकाऱ्यांची अवघ्या काही दिवसातच बदली झालेली आहे. ठेवीदारांना न्याय मिळावा म्हणून आरोपींच्या पाठी कारवाईचा ससेमिरा लावला की तात्काळ बदली होते आणि आरोपींना कोठडी मिळाली की लगेच आरोपी आजारी पडतात असे अनेक चमत्कार या तपासात नगरकरांना पाहायला मिळत आहेत.
नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणात आरोपींवर हात टाकला की बदली, पुन्हा एकदा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली…

0Share
Leave a reply