श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : श्रीरामपूर मध्ये सध्या वाळू डोपोच्या नावाखाली सर्रासपणे वाळूचोरी सुरु आहे. अशाच प्रकारच्या घटना तालुक्यातील गोदापट्ट्यात घडली आहॆ. गोदावरी नदीपात्रात मातुलठाण व नायगाव येथे सरकारी वाळू डेपोच्या नावाने परस्पर वाळू उत्खनन करून वाळू वाहतूक करताना 3 डंपर, 1 टेम्पो, 1 ट्रॅक्टर, 3 ट्रॉली चोरीच्या वाळूसह पोलिसांनी नुकत्याच पकडल्या. परिक्षाविधीन पोलीस अधिक्षक जीवन बेनिवाल यांनी ही धडक कारवाई केली आहे.
यावेळी पोलिसांनी सुमारे 44 लाखांची वाहने जप्त केली आहे. भरदिवसा ही वाळूचोरी सरकारी ठेक्याच्या नावाखाली सुरु होती. पोलिसांनी पकडलेल्या गाड्यांचे मालक व चालक यांनी कोणतीही कागदपत्र सादर केली नाहीत. याप्रकरणी पोलीस हवालदार वैभव काळे यांच्या फिर्यादीवरून सदर गाड्यांच्या मालकावर व चालकावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी वाळू डेपोच्या नावाखाली सुरू असलेल्या वाळू चोरीचा तपास परिक्षाविधीन पोलीस अधिक्षक बोनिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी व सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निकम करत आहे.
दरम्यान, पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली काल रविवारी भरदिवसा दुपारी परिक्षाविधीन पोलीस अधिक्षक जीवन बेनिवाल यांनी तालुक्यातील वांगी परिसरात छापा टाकून वाळू चोरणारा जेसीबी व एक डंपर पकडले. सरकारी वाळू डेपोच्या नावाखाली गोदापट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाळूउपसा होत आहे. अनेक वाळूतस्कर नियमांचे उल्लंघन करुन वाळूचा उपसा करत असल्याने त्याचा सामान्य नागरिकांना मोठा त्रास होतो. त्यामुळे पोलीस प्रशासनाने अशाच प्रकारे धडक करवाया सुरु ठेवाव्यात अशी, अपेक्षा नागरिकांनी केली आहे.
दरम्यान पोलिसांच्या या कारवाईनंतर श्रीरामपूर तहसीलदारांनी परिविक्षाधिन पोलिस अधिकारी यांना लेखी पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, तालुक्यातील मातुलठाण येथे दि. 27 एप्रिल रोजी पोलीस प्रशासनाने वाळू चोरीबाबत काही वाहनांनवर कारवाई केली होती. परंतू दि. 27 रोजी सरकारी वाळू डेपो सुरुच होता, डेपो चालकांनी करारनामा करुन दिलेला असल्याने परवानगी घेण्याची आवश्यकता नव्हती, पकडलेली वाहने ही करारनाम्यातीलच असल्याचे आढळून आलेले आहे, तसेच त्या दिवशी गोदावरी नदीपात्रातून 32 ब्रास वाळू इन स्टॉक केलेली असून त्यातील 11 ब्रास वाळू उचललेली दिसून येते, सदर वाहने कुठे पकडली, वाहनांमध्ये गौणखनिज होते की नाही याचाही बोध होत नाही, असेही या पत्रात म्हटले आहे.
श्रीरामपूर येथे वाळू डेपोच्या नावाखाली वाळूचोरी ; परिक्षाविधीन पोलीस अधिक्षक जीवन बेनिवाल यांची धडक कारवाई

0Share
Leave a reply