Disha Shakti

इतर

स्थानिक गुन्हे शाखेत उरले अवघे 13 अधिकारी व कर्मचारी, ‘डिटेक्शन’वर परिणाम होणार गंभीर गुन्हे रोखण्याची जबाबदारी कोण घेणार?

Spread the love

अ. नगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कारभारा विरोधात खा. नीलेश लंके यांनी सोमवारपासून उपोषण सुरू केले. दरम्यान, त्यांनी आरोप केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या उपोषण सुरू होण्यापूर्वीच बदल्या करण्यात आल्या असून यापूर्वी बदल्या झालेल्या अंमलदारांना देखील कार्यमुक्त करण्यात आले आहे. यामुळे गुन्हे शाखेतील संख्याबळात घट झाली असून याचा परिणाम गुन्ह्याची उकल करण्यावर होणार आहे. यामुळे याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न आहे.

जिल्ह्यातील गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची उकल करणे, अवैध धंद्यावर छापेमारी करणे, व्हिआयपी बंदोबस्त करणे आदी कामे या शाखेमार्फत केली जातात. जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण पाहता मंजूर संख्याबळापेक्षाही अधिक पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या नियुक्त्या गुन्हे शाखेत होत्या. दरम्यान, गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकडून हप्ते वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप करत खा. लंके यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. तसे निवेदनही त्यांनी पोलिसांना दिले होते. त्या निवेदनाची दखल पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घेतली व मागील वर्षी बदली झालेल्या परंतु गुन्हे शाखेतून कार्यमुक्त न केलेल्या 17 पोलीस अंमलदारांना तात्काळ कार्यमुक्त केले. आरोप झालेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांची चौकशी सुरू केली.

चालू वर्षी बदली पात्र असलेल्या 14 पोलीस अंमलदारांच्या गेल्या शनिवारीच बदल्या केल्या. बदली पात्र असलेल्या दोन पोलीस उपनिरीक्षक यांची बदली देखील नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी जिल्ह्याबाहेर केली आहे. सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पथकातील तिघांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. यामुळे अधिकारी व अंमलदार असे मिळून 49 संख्याबळ असलेल्या गुन्हे शाखेत सध्या फक्त तीन अधिकारी व 10 अंमलदार असे 13 जणांचे संख्याबळ राहिले आहे.

पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्यासह एक सहायक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक, तीन पोलीस हवालदार, दोन पोलीस नाईक व पाच पोलीस शिपाई असे 13 जण गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. जिल्ह्यातील गुन्हेगारी पाहता गुन्हे शाखेतील हे संख्याबळ कमी पडणार आहे. लंके यांच्यावर आरोपामुळे अधीक्षक ओला यांनी सध्यातरी गुन्हे शाखेच्या संख्याबळात वाढ करण्याचा विचार केलेला नसल्याचे दिसून येते. यामुळे जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात गुन्हे शाखेला अडचणी होणार आहे.

एकुण मंजूर संख्याबळ 26
स्थानिक गुन्हे शाखेसाठी अधिकारी व अंमलदार मिळून 26 जणांचे मंजूर संख्याबळ आहे. यामध्ये दोन पोलीस निरीक्षक, चार सहायक पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक, चार सहायक फौजदार, 10 पोलीस हवालदार, दोन पोलीस नाईक, चार पोलीस शिपाई अशा एकूण 26 जणांचा यामध्ये समावेश आहे. परंतु, जिल्ह्यातील गुन्हेगारी पाहता मंजूर संख्याबळापेक्षा जास्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा भरणा गुन्हे शाखेत करण्यात आला होता. यामुळे जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.

अनुभवी अंमलदारांची एकाचवेळी बदली
मागील वर्षी बदल्या झालेल्या 17 पोलीस अंमलदार व चालू वर्षी बदल्या झालेल्या 14 पोलीस अंमलदारांमध्ये अनुभवी अंमलदारांचा समावेश होता. एकाचवेळी सर्वांची बदली झाल्यामुळे गुन्हे शाखेत अनुभवी अंमलदारांची संख्या राहिलेली नाही. परिणामी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. नवीन अंमलदारांना नियुक्ती दिल्यानंतर त्यांना जिल्ह्यातील गुन्हेगारी, संशयित आरोपी, खबर्‍यांचे नेटवर्क उभारणीसाठी अधिक वेळ जाणार आहे. यामुळे भविष्यात गुन्हे शाखेच्या कामकाजावर परिणाम होणार आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!