विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : आबालवृद्धाचें लाडके दैवत असणाऱ्या विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागतासाठी भक्त सज्ज झाली असून सकाळपासूनच गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात उत्साही वातावरणात श्री गणेशाचे थाटामाटात प्रतिष्ठापना करण्यासाठी लागणाऱ्या विविध सजावट साहित्याने आणि गणेश मूर्तींनी दुकाने सजल्याने टाकळीढोकेश्वरची बाजारपेठ गर्दीने फुलून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. वर्षभर श्री गणेशाच्या प्रतिक्षेत असलेला युवा वर्ग आज गणेशाच्या आगमनाने आनंदीत झालेला होता.
बाजारपेठेत श्री गणेशाच्या विविध मूर्ती पहावयास मिळाल्या. मोरावर बसलेले बप्पा, जास्वंदीच्या फुलांमध्ये सजवलेले गणराया, चंद्रकोरीवर असलेले गणराया, शंकर पार्वती व गणराया, लालबागचा राजा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई अशा विविध श्री. गणेशाच्या मूर्ती व सजावट अधिक आकर्षक आणि भरीव दिसावी यासाठी विविध रंगातील पताका, झिरमिळ्या, तोरण, गळ्यातील माळा, गणपतीसाठी विविधरंगी फेटे, फुलांच्या माळा,जाळीचे पडदे, झुंबर, लाकडी मंदिर व मखर, विविधरंगी लहान – मोठे फुगे,लाईट माळी, विविध खेळण्या खरेदीसाठी बाल गोपालांबरोबरच ग्रामस्थांनी गर्दी केलेली होती.
महिला वर्गाची किराणा दुकानाच्या बाहेर खरेदीसाठी गर्दी पहावयास मिळाली. श्री गणेशांचे आगमन होत असल्यामुळे टाकळी ढोकेश्वर परिसरातील सर्वच गणेश मंडळांनी आपल्या मंडळापुढे शेड उभारणीचे काम सुरू केले आहे तर काही मंडळाचे शेड उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. प्रत्येक मंडळातील कार्यकर्ते, पदाधिकार्यांनी पुढील दहा दिवसांत कोणते कार्यक्रम घ्यावयाचे याचे नियोजन व चर्चा सुरू केलेली आहे. बाप्पांचे आगमन होत असून भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला असल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Leave a reply