Disha Shakti

क्राईम

संगमनेरमध्ये अपघात झाल्यानंतर भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांना बेदम मारहाण

Spread the love

संगमनेर प्रतिनीधी / धनेश कबाडे : अपघात झाल्यानंतर भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांना जमावाने शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास संगमनेर शहरातील तीनबत्ती चौक परिसरात घडली. मारहाण करणार्‍यांना त्वरीत अटक करावी या मागणीसाठी तरुणांचा मोठा जमाव शहर पोलीस ठाण्यात जमा झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, की शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शहरातील दिल्ली नाका परिसरातील एका पेट्रोल पंपासमोर दुचाकीचा अपघात झाला होता. या ठिकाणी निमोण येथील मिलिंद बबन घुगे (वय 27) थांबले. वाहन चालकांना समजावून सांगत असताना तेथे उपस्थित असलेल्या जमावातील तरुणांनी घुगे यांना मारहाण केली. याठिकाणी उपस्थित असलेले अविनाश रोहिदास गुंजाळ (रा. गुंजाळनगर, संगमनेर) यांनाही काही तरुणांनी मारहाण केली. जमावातील तरुणांपैकी काहींनी हातातील टणक वस्तूने, बेल्टने घुगे यांना मारहाण करुन त्यांचा मोबाईल फोडला. तसेच अविनाश गुंजाळ यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी तोडून ती घेऊन गेले. इतरांनी या दोघांना मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली.

एका जमावाने मारहाण केल्याची वार्ता पसरल्यानंतर संतप्त अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमा झाले. निमोणचे सरपंच संदीप देशमुख, मनसेचे योगेश सूर्यवंशी, शिवसेनेचे शहरप्रमुख दिनेश फटांगरे, गुंजाळनगर परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने तत्काळ शहर पोलीस ठाण्यात पोहोचले. मारहाण करणार्‍या आरोपींना त्वरीत अटक करावी अशी मागणी त्यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्याकडे केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक देशमुख यांनी पोलीस पथक त्वरीत घटनास्थळी पाठवले. आरोपींची ओळख पटवून त्यांची दुचाकी जप्त केली. या घटनेतील सर्व आरोपींना अटक करण्यात येईल असे त्यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांना सांगितले. त्यानंतर कार्यकर्ते निघून गेले. याप्रकरणी मिलिंद घुगे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 5 जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!