शिर्डी : शिर्डीमध्ये एका तोतया पोलीस अधिकऱ्याने शिर्डी भक्त निवासमध्ये फिरत वृद्ध नागरिकांची फसणूक करत होता. हा तोतया पोलीस शिर्डी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याच्या विविध पोलीस ठाण्यात २० हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
शिर्डी पोलिसांनी सदरची कामगिरी केली आहे. पोलिस असल्याची बतावणी करणारा एक इसम शिर्डीतील भक्त निवास परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे यांना मिळाली. यानंतर पथकासह त्या ठिकाणी पोहोचले. पोलिस आल्याची चाहूल लागतच संबंधित व्यक्ती पळून जाण्याचा तयारीत होता. मात्र शिर्डी पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले. जाकीर उर्फ जग्गू युसुफ खान (वय ३०) असे तोतया पोलिसाचे नाव आहे.
जाकीर हा वृद्ध नागरिकांना हेरायचा. यानंतर पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करून तपासणीच्या नावाखाली त्यांच्याकडील दागिने, पैसे लंपास करायचा. आज शिर्डीतील पाचशे रूम भक्त निवास परिसरात सावज शोधत असतानाच शिर्डी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी आरोपीला लोणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस त्याची कसून चौकशी करत असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील जाकीर खान हा रहिवासी आहे. त्याच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव आणि लोणी पोलिस ठाण्यासह राज्यातील विविध पोलिस ठाण्यात २० हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. आरोपी जाकीर खान याच्याकडे अनेक खोटी ओळखपत्र आणि विना नंबरची दुचाकी मिळून आली. तर त्याच्याकडे सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक पाटील नावाने खोटे ओळखपत्र मिळून आले आहे.
तोतया पोलीस अधिकारी बनून तपासणीच्या नावाने वृद्ध नागरिकांची लुबाडणूक करणारा तोतया पोलिस शिर्डी पोलिसांच्या ताब्यात

0Share
Leave a reply