अहिल्यानगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : गरुड फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. २०२५ यावर्षी आध्यात्मिक धार्मिक व वारकरी संप्रदायात उल्लेखनीय कार्य करणारे पारनेर तालुक्यातील टाकळीढोकेश्वर येथील रहिवासी असलेले सुप्रसिद्ध युवा किर्तनकार व समाज प्रबोधनकार तसेच श्रीमद् आद्य जगद्गुरु शंकराचार्य भक्तीयोग आश्रम (आणे) चे ह.भ.प. प्रेमानंद महाराज (शास्त्री) आंबेकर यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
गरुड फाउंडेशनचे कार्याध्यक्ष रमेश खेमनर यांनी जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात गेल्या काही वर्षात आपण करत असलेल्या उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन, आपल्या कार्याचा गौरव व प्रोत्साहन देण्याच्या हेतूने आपणास राज्यस्तरीय वारकरी भूषण पुरस्कार जाहीर करीत आहोत. ह.भ.प. प्रेमानंद महाराज हे आध्यात्मिक वारकरी क्षेत्रात मागील काही वर्षापासून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील विविध सामाजिक उपक्रमांना मार्गदर्शन करत आपल्या किर्तनातून समाज प्रबोधनाचे प्रभावी कार्य करीत आहेत.
तसेच प्रेमानंद महाराज यांना यापूर्वीही अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे टाकळी ढोकेश्वर परिसरात कौतुक होत आहे.
Leave a reply