Disha Shakti

Uncategorized

जैविक खतांच्या वापरामुळे जमिनीची उत्पादकता वाढते – अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ

Spread the love

प्रतिनिधी (प्रमोद डफळ) :  राहुरी विद्यापीठ, दि. 23 ऑगस्ट, 2022 :   शेतीमध्ये पिकांच्या उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करावा. रासायनिक खतांच्या अती वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडून त्याचा परिणाम पिकाच्या उत्पादनावर होत आहे. यासाठी जैविक खतांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास जमिनीची उत्पादकता वाढण्यास मदत होते असे प्रतिपादन अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी केले.

        भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील आयओटी सद्यक्षम व सेंसर आधारीत अद्ययावत सिंचन व्यवस्थापन प्रणाली प्रकल्पांतर्गत मनुष्यचलीत शेती औजारे व जैविक खते वाटप कार्यक्रम बाबुर्डी घुमट, अहमदनगर येथे आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक आणि कृषि अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सुनिल गोरंटीवार तसेच स्मार्ट इरिगेशन प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. मुकुंद शिंदे, सेवा फाउंडेशनचे डॉ. उमेश लगड व बाबुर्डी घुमट येथील सरपंच श्री. शेखर पंचमुख हे उपस्थित होते.

          कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. उमेश लगड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी अनुसुचीत जाती उपयोजनेतंर्गत जैविक खते व मनुष्यचलीत औजारांविषयी शेतकर्यांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. प्रमोद रसाळ यांच्या हस्ते शेतकर्यांना औजारे व जैविक खतांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून इंजि. तेजश्री नवले, श्री. गोरक्ष शिरसाठ व श्री. अमोल गायकवाड यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. मुकुंद शिंदे यांनी केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!