प्रतिनिधी / विजय कानडे : पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव तालुक्यातील तेर येथे बुधवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी दुपारी एक ते दोनच्या दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या तीन वेगवेगळ्या पथकानी तीन ठिकाणी छापे टाकून जुगाराचे साहित्य, संगणक संच, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 1,48,020/- (एक लाख अठ्ठेचाळीस हजार वीस)रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.
पहिल्या पथकाने पुराण वस्तुसंग्रहालया जवळील पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकल्यावर विजय बिभीषण नाईकवाडी व अक्षय बाळू सुरवसे राहणार तेर यांना ऑनलाइन जुगार खेळताना जुगाराच्या साहित्यासह एकूण 64 हजार 200 रुपयासह ताब्यात घेतले. दुसऱ्या पथकाने बस स्टँड परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकून नवनाथ नानासाहेब शिंदे राहणार बुकनवाडी नानासाहेब प्रकाश पिठले, चंद्रकांत विजय रसाळ या तिघांना ऑनलाईन चक्री जुगार खेळताना जुगाराच्या साहित्यासह रोख रखमेसह एकूण 34 हजार 800 रुपयासह ताब्यात घेतले. तिसऱ्या पथकाने तेर पेठ भागातील पत्र्याच्या शेडमध्ये सुकेश रतन माने यास ऑनलाईन चक्री जुगार खेळताना मोबाईल रोख रकमेसह एकूण 49 हजार वीस रुपयासह ताब्यात घेतले असून या व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार ढोकी पोलीस स्टेशन येथे स्वतंत्र तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तेरमध्ये अवैध धंद्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात बोकाळले असून मुख्य रस्त्यावर जवळपास सहा ऑनलाईन जुगार सेंटर आहेत.त्यापैकी फक्त तीन जुगार सेंटरवर कारवाई झाली आहे.
हा जुगार पडद्याआड चालत असल्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाला दिसत नाही का? वरिष्ठ याकडे लक्ष घालतील का? असे प्रश्न नागरिकांना भेडसावत आहेत. गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैद्य धंद्यावाल्यांसह ऑनलाइन जुगार खेळवणाऱ्यांचे चांगलेच धाबे दनानले आहेत . गून्हे शाखेच्या या कारवाईमुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत असून ह्या ऑनलाइन भिंगरीमुळे कित्येकांच्या संसाराची राख रांगोळी झाली आहे. तर कित्येकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे अवैध धंदे कायमचे बंद होतील का ? अशा चर्चा नागरिकांत होत आहेत. सदरची ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव ,सह पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर ,पोलीस उपनिरीक्षक संदीप ओहोळ, अंमलदार ऊली उल्ला काझी, हुसेन सय्यद, विनोद जानराव, शौकत पठाण, इरफान पठाण ,नितीन जाधवर, रवींद्र आरसेवाड यांच्या पथकाने केली.