प्रतिनिधी / शेख युनुस : छत्रपती शिवाजी महाराज समतेचे न्यायाचे व बंधुत्वाचे प्रतीक होते म्हणूनच त्यांनी लोककल्याणकारी स्वराज्य निर्माण केले होते. म्हणूनच त्यांच्या सामाजिक न्यायाच्या संदेशाला अनुसरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त सावित्री फातिमा विचार मंचच्या माध्यमातून आश्रमशाळा ढवळपुरी येथील विद्यार्थ्यांना इंग्रजी – मराठी ऑक्सफर्ड डिक्शनरीचे वितरण संत साहित्याचे अभ्यासक डॉ. आर. जी. सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव रेहान काझी होते तर संस्थेचे अध्यक्ष शाहिद काझी, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संदीप महांडुळे, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक बापूसाहेब रुपनर, अधीक्षक आप्पासाहेब पवार आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. आर जी सय्यद म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सर्वसामान्य जनता ही आनंदी व सुखी होती. स्त्रिया, दुर्बल घटक, दिनदलित यांना समाजात मानाचे स्थान होते. मुस्लिमांसह अठरा पगडजातीचे मावळे शिवरायांसोबत होते. त्यामुळे समाजामध्ये सामाजिक न्यायाचे धोरण होते. आज स्त्रियांवर दिवसाढवळ्या अन्याय, अत्याचार होत आहे. शिवाजी महाराजांच्या काळात अन्याय, अत्याचार करणाऱ्या व्यक्तींना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जात होती. महाराजांनी त्या काळात समता, बंधुता, न्याय, स्त्रियांचा आदर आदी गोष्टींवर विशेष लक्ष दिले होते तर अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, अनैतिकता अत्याचार आदींना त्यांच्या स्वराज्यात थाराच दिला नव्हता.
आजचे युग हे स्पर्धेचे असून जागतिक स्तरावर शिक्षणामध्ये इंग्रजी भाषेला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील गरजू व गरजवंत १००० विद्यार्थ्यांना दर्जेदार अशा इंग्रजी – मराठी ऑक्सफर्ड डिक्शनरीचे वाटप सावित्री फातिमा विचार मंचच्या वतीने केले जाणारा असून आश्रमशाळा ढवळपुरीतील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शंभर विद्यार्थ्यांना या डिक्शनरीचे वाटप करून त्याचा शुभारंभ करण्यात येत आहे. यातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल असेही डॉ. सय्यद यावेळी म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात रेहान काझी म्हणाले की डॉ. आर जी सय्यद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून डिक्शनरी वाटपाचा हा जो उपक्रम राबविला आहे तो समाजातील गरीब व गरजवंत विद्यार्थ्यांसाठी खूप मोलाचा आहे. हा एक आगळावेगळा उपक्रम असून यातून त्यांची समाजाबद्दलची आपुलकी दिसून येते. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संदीप महांडुळे यांनी प्रास्ताविक केले तर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक बापूसाहेब रुपनर यांनी आभार मानले. शिक्षक लतिफ राजे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a reply