पुणे प्रतिनिधी / रामचंद्र कचरे : जलसंपदा विभाग आणि महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या बैठकीत पाणी कपातीचा कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे पुणेकरांवर असलेली पाणी कपातीची टांगती तलवार तुर्तास तरी टळली आहे. पाणी कपातीचा निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत होऊ शकतो.
पुणे शहराला पाणी पुरवठा केला जाणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत साडेबारा टिएमसी पाणीसाठा आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत फारसा फरक नाही. शेतीच्या उन्हाळी आवर्तनासाठी जलसंपदा विभागाला पाच टिएमसी पाण्याची आवश्यकता आहे. तर पुणे शहराला पाणी पुरवठ्यासाठी सात टिएमसी पाण्याची आवश्यता आहे. अद्याप उन्हाळा दीड महिना असून या कालावधीत पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण जास्त असते.
या कालावधीत साधारण दोन टिएमसी पाण्याचे बाष्पीभवन होण्याचा अंदाज आहे. याचा विचार करुन पुणे महानगरपालिकेने पाण्याचा वापर काटकसरीने करावा अशा सूचना जलसंपदा विभागाने दिल्या आहेत, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.जलसंपदा विभाग आणि महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या झालेल्या बैठकीत पाणी गळती रोखण्यासाठी पालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाय योजनांची माहिती देण्यात आली.
13 ठिकाणी गळती शोधली
पुणे महापालिकेने पाणी गळती रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. पाणी गळती शोधण्यासाठी पालिकेकडून प्रायोगिक तत्वावर ‘ऑकेस्टीक सेन्सर’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला आहे. यामुळे वडगाव जलकेंद्रापासून कात्रज येथील केदारेश्वर पाण्याच्या टाकीपर्य़ंत मुख्य वाहिनीवर 13 ठिकाणी पाणी गळती होत असल्याचे आढळून आले. त्यानुसार पाणी गळती बंद करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. अशाच पद्धतीने मुख्य वाहिन्यांमधून होणारी पाण्याची गळती शोधून ती बंद केली जाणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर रात्रीच्यावेळी करावा लागणार आहे. कारण दिवसा वाहतुक व इतर आवाजामुळे योग्य निष्कर्ष हाती लागत नसल्याचे निदर्शनास आले आहे.खडकवासला जलवाहिनीची दुरुस्ती लांबली
पुणे महापालिकेने 25 वर्षापूर्वी खडकवासला ते पर्वती जलकेंद्र अशी 12 किमीची जलवाहिनी टाकली होती. या जलवाहिनीला गंज चढला आहे. तसेच काही ठिकाणी दुरुस्ती, रंगरंगोटी करावी लागणार आहे. या कामासाठी पालिकेने तीन टप्प्यात निविदा काढल्या होत्या. मात्र याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु केल्यानंतर पालिकेला कालव्यातून प्रति दिन तीन हजार एमएलडी पाणी उचलावे लागत आहे. सध्या कालव्यातून पाणी सोडण्याचे प्रमाण कमी असल्याने याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होऊ शकतो. त्यामुळे या जलवाहिनीच्या दुरुस्ती, रंगरंगोटीचे काम ऑक्टोबर महिन्यांतर करावे, अशी सूचना जलसंपदा विभागाने दिली आहे.पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई सुरु
पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून बांधकाम, वाहने धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. बांधकामासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यास काही बांधकाम व्यावसायिकांनी सुरुवात केली आहे.
याशिवाय वॉशिंग सेटंर चालवणाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांचे नळजोड तोडण्यात आले आहेत. तसेच उन्हाळ्यात कोणत्या प्रकारचे नवीन नळजोड देणे बंद करण्यात आले आहे.
पुणे महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग व जलसंपादा विभाग बैठक संपन्न पुणेकरांची तूर्तास पाणी कपात टळली

0Share
Leave a reply