Disha Shakti

Uncategorized

बारसूमध्ये पुन्हा संघर्षाचे वातावरण; आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज

Spread the love

विभागीय प्रतिनिधी / : राजापूर बारसू परिसरात पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. येथील महिला व ग्रामस्थ कोणत्याही परिस्थितीत आम्ही सर्वेक्षण बंद पडणारच या भूमिकेवरती ठाम आहेत. येथील महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलीस प्रशासनाकडून त्यांना सांगण्यात आल्यावरही आंदोलक माती परीक्षण होऊ न देण्यावर ठाम आहेत. त्यामुळे पोलिसांना पुन्हा एकदा सौम्य लाठीमार करावा लागला आहे. या सगळ्या प्रकरणी आता पोलिसांकडून काहीजणांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी रणरणत्या उन्हात अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान काही आंदोलनकर्त्यांना उष्माघातामुळे चक्करही आली. गेले दोन दिवस काहीसं शांत असलेलं बारसू पुन्हा पेटलं आहे. शेकडो पोलिसांचा फौजफाटा इथे तैनात करण्यात आलाय.

शेतकऱ्यांच्या विरोधानंतर माती परीक्षण करण्यावर सरकार ठाम आहे. शेतकऱ्यांनी चर्चेसाठी यावं, आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, आम्हाला जबरदस्ती करायची नाहीये. मात्र आंदोलकांनी विरोधाला विरोध करु नये, अशी विनंती सरकारच्या वतीने मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. दुसरीकडे ही विनंती आंदोलक शेतकऱ्यांनी धुडकावून लावत प्रदूषणकारी प्रकल्प आम्हाला नकोच, म्हणत आपल्या भूमिकेवर ठाम आहे.

बारसूमध्ये सध्या काय परिस्थिती?

रिफानरीच्या माती सर्व्हेक्षणाला विरोध करण्यासाठी माळरानावर प्रकल्पविरोधक जमले असून त्यांची भेट घेण्यासाठी निघालेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना राजापूर येथील पोलीस स्थानाकात नेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. राऊत यांच्यासह संपर्क प्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख कमलाकर कदम, तात्या सरवणकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

विनायक राऊत पोलिसांच्या ताब्यात

तत्पूर्वी बारसू येथील प्रकल्पविरोधकांची भेटीसाठी निघालेले खासदार विनायक राऊत यांची गाडी पोलिसांनी अडवली होती. पोलिसांनी त्यांना आंदोलकांपर्यंत पोहोचू दिले नाही. पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध म्हणून खासदार राऊत यांनी शिवसैनिकांसह रानतळे येथे रस्त्यावर ठिय्या मांडला.

जिल्ह्यातील प्रस्तावित बारसू रिफायनरीसंदर्भात गुरुवारी शिवसेना भवन येथे विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत ग्रामस्थांच्या समस्यांचा पाढा वाचला. यावेळी उपनेते रवींद्र मिर्लेकर, माजी आमदार दगडू सकपाळ उपस्थित होते. सरकारकडून सुरू असलेल्या दडपशाहीची आणि पोलिसी बळाचा गैरवापर वापर करून कशा प्रकारे ग्रामस्थांमध्ये दहशत पसरवली जात आहे याबाबत माहिती दिली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!