इंदापूर तालुका प्रतिनिधी / प्रविण वाघमोडे : समाजसेवा करायची म्हटलं तर सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रच असायला हवे असे नाही तर इतर माध्यमातून देखील समाजसेवा करायला येते याचा प्रत्यय भिगवणकरांना गौतम शेलार व विराज पुजारी यांच्या रूपात वेळोवेळी पहायला मिळत आहे.
गौतम शेलार व विराज पुजारी हे गेली १५-१६ वर्षे भिगवण व भिगवण परिसरात वन्य पशू-पक्षी संवर्धनाचे काम विनामोबदला व निस्वार्थ करत आहेत.असाच एक प्रसंग दि. ३ मे रोजी घडला. सकाळी ६.३० ला भिगवण मधील प्रसिद्ध सर्पमित्र गौतम शेलार यांना फोन वरून राजेश रोकडे यांनी माहिती दिली की आमच्या घराच्या परिसरात साप निघाला आहे. लगेच क्षणाचा विलंब ही न लावता गौतम शेलार यांनी घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण परिसराची पाहणी केली असता त्यांना देशात अत्यल्प नोंदी असलेला अतिशय दुर्मिळ भारतीय मृदू जातीचा म्हणजेच गजरा (इंग्रजी मध्ये स्मूद स्नेक ) जातीचा साप त्यांना आढळून आला. त्यांनी लागलीच गजरा जातीचा साप पकडून वनविभागास या सापाबद्द्ल माहिती दिली.
भिगवणच्या नैसर्गिक इतिहासात प्रथमच अशा दुर्मीळ सापाची नोंद झाली आहे.गजरा हा पूर्णपणे बिनविषारी असून त्याची लांबी ही जास्तीत जास्त २२ इंच असते. मात्र भिगवण येथे पकडलेल्या गजरा सापाची लांबी ही ११ इंच आहे. पाल, सरडा, छोटे बेडूक हे त्याचे प्रमुख अन्न आहे.तसेच या सापाबद्दल खूप कमी माहिती उपलब्ध आहे.गौतम शेलार व त्यांच्या सहकाऱ्यांनी या सापास पकडून व त्यास जीवनदान देऊन भिगवण नैसर्गिक इतिहासात भर टाकली आहे.गौतम शेलार यांचे व त्यांच्या टीम चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तसेच हा साप वनविभाग अधिकारी श्री.उल्हास मोरे यांच्या ताब्यात देऊन त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडणार आहे असेही त्यांनी सांगितले.तसेच भिगवण व भिगवण परिसरात कोठेही वन्य पशू पक्षी, साप जखमी किंवा दिसल्यास आम्हाला कळवा असेही गौतम शेलार यांनी आवाहन केले आहे. (गौतम शेलार. ९९६०९८७७४३)
Leave a reply