Disha Shakti

Uncategorized

शिवसृष्टी वस्तूसंग्रहालय प्रदर्शनास पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट

Spread the love

प्रदर्शनाच्या व्यापक आयोजनासाठी शिर्डी संस्थानने पुढाकार घ्यावा – पालकमंत्री

दिशा शक्ती न्युज : प्रमोद डफळ, शिर्डी – महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज शिर्डी येथील शिवसृष्टी प्रदर्शनास भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास घराघरांत पोहोचविण्यासाठी शिवसृष्टी प्रदर्शनाची व्यापक प्रसिद्धी झाली पाहिजे. यासाठी या प्रदर्शनाच्या व्यापक पद्धतीने आयोजनासाठी श्री‌.साईबाबा संस्थानने पुढाकार घ्यावा. अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

साई प्रसादालय इमारतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील शस्त्रे, युद्धसामग्री, व चित्रांचे शिवसृष्टी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे आयोजन शिवप्रेमी अभिजित पाटील यांनी केले आहे. श्री. साईबाबा संस्थानने शिवसृष्टी प्रदर्शनासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे‌.

जगदंबा, मराठा , पट्टापान, मुल्हेरी आदी तलवारींच्या प्रतिकृती शिवसृष्टी वस्तूसंग्रहालय प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. तरंगाल, तोफेचा गोळा, खंजीर, दांडपट्टा, धनुष्यबाण, भाल्याचे विविध प्रकार, चिलखत, वाघनखे, कट्यार, ढाल, आदी शिवकालीन शस्त्रास्त्रांविषयी तसेच विविध तलवारींच्या प्रतिकृतींची शास्त्रशुद्ध माहिती पालकमंत्री श्री.विखे-पाटील यांनी यावेळी जाणून घेतली.

यावेळी पालकमंत्र्यांसोबत शिर्डी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव, विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी शंकर गायकर, साईबाबा प्रसादालयाचे व्यवस्थापक विष्णू थोरात आदी उपस्थित होते.

सध्या शिवसृष्टी प्रदर्शन साई प्रसादालयाच्या मागील बाजूच्या इमारतीत भरविण्यात आले आहे‌. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे प्रदर्शन आबालवृद्धांसाठी खुले आहे. प्रत्येकी १० रूपये शुल्कासह या प्रदर्शनाचा आपण आनंद घेऊ शकता. जास्तीत जास्त संख्येने नागरिक, भाविकांनी प्रदर्शनास भेट द्यावी‌. असे आवाहन आयोजक अभिजित शिंदे-पाटील यांनी केले आहे‌.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!