Disha Shakti

सामाजिक

माझ्या लहानपणीची पंढरीची वारी…

Spread the love

लेखक : भारत कवितके :  मी मूळचा पंढरपूर चा,माझ्या गावावर माझे अतोनात प्रेम आषाढी, कार्तिकी, चैत्री व माघी अशा एकादशीला पंढरपूर ला मोठ्या यात्रा भरतात.गमंत अशी की,आम्ही शाळेत असताना ” पंढरपूर चे लोक वाऱ्यावर जगतात”हा एक वाक्यप्रचार प्रचलीत असायचा.हा शब्दालंकार सगळीकडे बोलला जायचा,” वाऱ्यावर ” या शब्दाचे दोन अर्थ होत असत.एक वारे म्हणजे हवा,जी जगण्यासाठी सर्वांनाच लागते,तर दुसरा अर्थ म्हणजे वाऱ्या म्हणजे यात्रा होय.गावातील लहान मोठे व्यावसायिक आपल्या दुकानात विक्रीसाठी वस्तू,सामान भरुन ठेवायचे

छोटे व्यावसायिक म्हणजेच चणे,शेंगदाणे,साखर फुटाणे, कुरमुरे,बतासे,पेढे,अगरबत्ती,तुळशी माळा, हळद, कुंकू, अबिर, गुलाल,देवदेवतांचे फोटो, विणा, टाळ, मूर्ती,मृदुंग,आध्यात्मिक विषयी वेगवेगळी पुस्तके, अशा प्रकारची प्रासादायिक,व पूजेच्या सामानाची दुकाने यात्रेपूर्वी खचाखच भरलेली असत.यात्रेत प्रचंड प्रमाणांत विक्री होऊन यात्रा संपली की,दुकाने खाली दिसून येत असायची,प्रचंड प्रमाणांत विक्री होऊन आर्थिक फायदा दुकानदाराना होत असत.

यामुळेच ” पंढरपूरचे लोक वाऱ्यावर जगतात” हा शब्दालंकार चा दुसरा अर्थ होय.पंढरपूर मध्ये यात्रेला सुरुवात झाली की,परगावचे नातेवाईक ,ओळखीचे लोक हक्काने गावात नातेवाईकांकडे यायचे.त्यावेळी आम्हा लहान मुलाना खाऊसाठी पैसेही द्यायचे,आम्ही ते पैसे यात्रेत खर्च करायचो.यात्रेत घेतलेल्या वस्तू एकमेकांना उत्सुकतेनं दाखवत असत.पंढरपूर मधील यात्रेला सुरुवात झाली की नगरपालिकेच्या व खाजगी शाळा वारकरी लोकानी खचाखच भरुन जायच्या. प्रत्येक शाळेत यात्रा संपून पौर्णिमेच्या गोपाळ कालाने यात्रेचा समारोह होईपर्यंत शाळेला सुट्टी असायची. कार्तिकीवारी दिवाळीच्या आसपास येत असल्याने यात्रेची व दिवाळीची सुट्टी एकत्रीत खूपच लांब दिवसाची असायची.

शाळेतील वर्गावर्गात वारकरी राहयचे,पण एकदा वारी संपली की,वर्गात मुलांची संख्या सुरुवातीला खूपच कमी असायची,त्या मागचे कारण म्हणजे यात्रे दरम्यान वारकरी वर्गातच दगड विटांच्या चुली मांडून जेवन तयार करीत असत.सर्व वर्गात जिकडे तिकडे दगड विटा च्या चुलीच दिसत असत.चुलीच्या धुरामुळे सारा वर्ग काळा झालेला असायचा.

जेवन करुन फेकलेल्या पत्रावळी,द्रोण अस्ताव्यस्त पडलेल्या असायच्या.यात्रा संपताच गावाच्या ओढीने वारकरी गावाकडे धाव घ्यायचे त्यानंतर मात्र आम्हाला शाळेतील मुलांना शाळा,वर्ग व शाळेचा परिसर धुऊन, घासून, पुसून स्वच्छ करावा लागायचा. गुरुजीही वर्गात काही शिकवित नसत यामुळे फारच कमी मुले शाळेत यायची.साफ सफाई पूर्ण झाल्यावर मुले शाळेत हळूहळू यायची,व शाळेतील मुलांची हजेरी यात्रेच्या वेळी नगरपालिकेच्या जकात नाक्यावर, आरोग्य केंद्रावर तात्पुरत्या स्वरुपात मुलांना काम मिळायचे, त्यावेळी बाल कामगार कायद्याचा विचार होत नव्हता.

मी यात्रे दरम्यान पंढरपूर येथील सर्व जकात नाक्यावर काम केले आहे,कॉलरा प्रतिबंधक लस पोचविण्यासाठी सर्व वाहनातील प्रवाशांना रांगेने सोडण्याचे काम मी अनेकदा यात्रे वेळी केले आहे. त्यातून मिळणाऱ्या पैशातून शालेय पुस्तके,वह्या व इतर शैक्षणिक साहित्य घेत असत.न्यू अकबर सिनेमा शेजारी लक्ष्मण प्रल्हाद मुळे या मोठ्या व्यापाऱ्याचे फोटो फ्रेमचे दुकान होते, व्यवहारात अत्यंत हुशार असलेले मुळे मालक गरिब, होतकरु,हुशार मुलांची गमंतीदार पध्दतीने मुलाखत घेऊन कामावर घेत असत.

सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत देव देवताच्या फोटोची होलसेल व किरकोळ विक्री करण्यासाठी. दुकानात वारकरी व गावातील लहान व्यापारी यांची सतत गर्दी असायची. कधी कधी पेनूरकराच्या अडत दुकानातून लेमन गोळीचा पुडा खरेदी करुन दर्शन रांगेत शिकायच्या. ” ये लेमन गोळी घ्या…लेमन गोळी”असे ओरडून गोळ्या विकताना गर्दीत अचानक एखादा ओळखीचा शिक्षक भेटाला की मी संकोचून पुडा पिशवीत लपवून गप्प होत असत,शिक्षक बारीक हसून पुढे निघून जात काहीही न बोलता.एखादी ओळखीची व्यक्ती भेटली की पुन्हा तीच कृती करायची.

पंढरपूर मध्ये येणारा वारकरी अशिक्षित जास्त प्रमाणात असल्याने मी व माझे काही मित्र एखाद्या झाडाभोवती जमा होऊन झाडाजवळ हळद कुंकू, गुलाल अबीर फुले,साखर ठेऊन पाया पडून त्या झाडाला प्रदक्षणा घालून लांब जाऊन उभे राहयचो, आमच्या सारखीच कृती वारकरी करुन त्या झाडाभोवती गर्दी होऊ लागे,आम्ही मित्र यावर खूपच हसायचो.तेथे झाडाच्या दर्शनासाठी वारकरी रांग लावीत असताना गावातील एखादी व्यक्ती हे करायला मज्जाव करुन वारकरी लोकांना सत्य पटवून सांगायची,आम्ही तेथून धुम ठोकून पळून जायचो.या मध्ये माझे बालपणीचे अशोक रोकडे,दत्ता कुलकर्णी, गोपाळ लोंढै,मिलींद देवल,दत्ता पिसे,कुमार सोनवणे, शेखर कुलकर्णी, यशवंत कांबळे, पोपट क्षिरसागर, विलास एकल, अनिल निंबाळकर या मित्रांचा समावेश असायचा. एकंदरीत माझ्या लहानपणीच्या पंढरीच्या वारीत खूप खूप मज्जा यायची.

भारत कवितके मुंबई कांदिवली मोबाईल नंबर ८६५२३०५७००


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!