Disha Shakti

इतर

जलजीवन मध्ये नागरिकांना विश्वासात घेऊन कामे करा – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

Spread the love

  • जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांच्‍या कामांचा आढावा

दिशा शक्ती न्यूज
प्रतिनिधी/ प्रमोद डफळ: शिर्डी – जलजीवन मिशन अंतर्गत गावोगावी सुरु असलेल्‍या पाणी पुरवठा योजनांवर लोकांचा अधिकार आहे. या योजनेच्‍या कामाची पूर्तता करताना नागरिकांना विश्‍वासात घेऊन ग्रामस्‍थांच्‍या सूचनांप्रमाणे योजनेच्‍या आराखड्यात पुन्‍हा बदल करा. योजनेच्‍या यशस्‍वितेसाठी अधिकाऱ्यांनी सुध्‍दा जबाबदारीने काम करावे. केवळ ठेकेदारांवर विसंबून योजनेची अंमलबजावणी करु नका. जिल्‍हाधिकारी, मुख्‍य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कामाच्‍या ठिकाणी अचानक भेटी देवून वस्‍तुस्थिती पहावी. अशा स्‍पष्‍ट सूचना राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आज येथे दिल्‍या.

राहाता, श्रीरामपूर, संगमनेर आणि राहुरी तालुक्‍यात सुरु असलेल्‍या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांच्‍या कामांचा आढावा महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी आज घेतला. माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, जिल्‍हाधिकारी सिध्‍दराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर, जिल्‍हा परिषदेच्‍या पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सोनवणे, सर्व विभागांचे प्रांताधिकारी, तहसीलदार आणि संस्‍थांचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी सर्वच तालुक्‍यातील पाणी पुरवठा योजनांचा गावनिहाय आढावा घेतला. गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांच्‍या योजनेच्या अंमलबजावणी बाबत असलेल्‍या तक्रारी तातडीने सोडवणूक करण्‍याबाबत त्यांनी प्रशासनाला सूचना केल्या. बहुतांशी गावांमध्‍ये ग्रामस्‍थाना विश्‍वासात न घेता योजनेचे काम सुरु असल्‍याच्‍या तक्रारी ग्रामस्‍थांनी केल्‍या हे अतिशय गंभीर आहे. ठेकेदारांच्‍या विश्वासावर योजनेची अंमबजावणी करू नका. अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

योजनेची अंमलबजावणी करताना अनेक गावांमध्‍ये ग्रामसभा झाल्‍या नाहीत, काही गावांमध्‍ये ग्रामसभेत केलेल्‍या ठरावानुसार योजनेत कोणताही अंतर्भाव झालेला नाही. त्‍यामध्‍ये बदल करुन, अधिकाऱ्यांनी पुन्‍हा ग्रामस्‍थांच्‍या मागणी नुसार या योजनांची आराखडे तयार करावेत. मागणी प्रमाणे योजनेचा वाढीव प्रस्‍ताव असेल तर पुन्‍हा मंजुरीसाठी पाठवा अशा सुचनाही त्‍यांनी यावेळी दिल्‍या.

योजनेमध्‍ये वापरण्‍यात येणा-या पाईप बाबतही या बैठकीत तक्रारी करण्‍यात आल्‍या. एका ठरावीक कंपनीचेच पाईप वापरावे अशी सक्‍ती योजनेत कुठेही नाही असे स्‍पष्‍ट करुन, त्‍यांनी सांगितले की, योजनेच्‍या बाबतीत कुठलाही निर्णय करताना आधिकारी आणि कंत्राटदारांनी ग्रामस्थांना विश्‍वात घेवूनच करावा. सर्व योजनेच्‍या अंमलबजावणीसाठी पंचायत समिती आणि जीवन प्राधिकरणाच्‍या आधिका-यांनी एकत्रित समन्‍वय ठेवावा. या योजनेच्‍या यशस्‍वीतेसाठी जिल्‍हाधिकारी आणि मुख्‍य कार्यकारी आधिकारी यांनी कामे सुरु असलेल्‍या गावांमध्‍ये अचानक भेटी देवून कामांचा आढावा घ्‍यावा. अशा सूचनाही महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी दिल्‍या आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!