Disha Shakti

इतर

क्लासला जातोय सांगून रामकुंडावर आंघोळीसाठी उतरलेल्या १४ वर्षीय तरुणाचा वाहत्या पाण्यात बुडून मृत्यू

Spread the love

नाशिक प्रतिनिधी / खंडू कोळेकर : रामकुंडावर वाहत्या पाण्यात आंघोळीसाठी उतरलेल्या नाशिकरोड येथील शाळेतील विद्यार्थ्याला पाण्याचा अंदाज आला नसल्याने त्याचा वाहत्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली आहे. आराध्य मोहन कराडकर (14) असे मुलाचे नाव आहे. आराध्य हा शनिवारी सकाळी स्कॉलरशिप क्लासला जाण्यासाठी घरातून सायकलवर बाहेर पडला होता. पुढे अमोल बिन व अक्षय शिंदे या मित्रांसोबत तो रामकुंडाजवळ आंघोळीला आला. दुपारी एक वाजेच्या सुमारास अमोल, अक्षय व आराध्य यांनी पाण्यात उड्या मारल्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने ते तत्काळ नदीच्या काठावर आले. मात्र, आराध्यने वाहत्या पाण्यात उडी मारली. त्याला पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे तो बुडून पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहत गेला.

या घटनेची माहिती गंगाघाटावरील नागरिकांनी पंचवटी पोलीस व अग्निशमन दलाला कळविल्यानंतर पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी गंगाघाटावर असलेल्या जीवरक्षक दलाच्या जवानांची मदत घेऊन बुडालेल्या मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी गाडगे महाराज पुलाजवळील नदीपात्रात आराध्यचा मृतदेह अग्निशमन दल व जीव रक्षक दलाच्या जवानांनी पाण्याबाहेर काढला. आराध्य हा नाशिकरोड जेलरोडवरील वृत्तपत्र विक्रेता मोहन मधुकर कराडकर यांचा एकुलता एक मुलगा होता. तो पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकत होता. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!