Disha Shakti

कृषी विषयी

विविध फळ निर्मितीवर आधारित प्रशिक्षणाच्या माध्यमातूनच उद्याचे उद्योजक घडतील – कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील

Spread the love

राहुरी विद्यापीठ / आर.आर.जाधव : फळे ही नाशवंत असतात. परंतु या फळांपासून विविध प्रक्रिया करून पदार्थ निर्मिती केली तर त्या फळांचे मूल्यवर्धन होते. परिणामी फळे पिकविणार्या शेतकर्यांचा आर्थिक फायदा होतो. फळ प्रक्रियेवर आधारित अशा प्रशिक्षणांमधूनच उद्याचे उद्योजक घडून ग्रामीण अर्थकारण मजबूत होऊ शकते असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने पाच दिवसीय आवळा फळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील बोलत होते. यावेळी संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, पदवीत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. बी. टी. पाटील व अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड उपस्थित होते.
डॉ. विठ्ठल शिर्के यावेळी म्हणाले की उद्योजक घडविण्यासाठी अशा प्रकारची फळ प्रक्रियेवरील प्रशिक्षणे फार फायद्याची असून हे प्रशिक्षण घेऊन स्वतःचा उद्योग सुरू करणारे उद्योजकच खर्या अर्थाने विद्यापीठाची ताकद आहे. डॉ. गोरक्ष ससाणे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींनी पदार्थ निर्मितीच्या आपल्या नवीन कल्पना या प्रशिक्षणामध्ये मांडा. त्यातूनच एखाद्या नव पदार्थाची निर्मिती होऊ शकते. आज जगात नाविन्यपूर्ण पदार्थ निर्मिती करणार्या उद्योजकांना मोठा वाव असल्याचे यावेळी ते म्हणाले. डॉ. खरबडे यांनी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या.

या पाच दिवसीय आवळा फळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमात आवळा कॅन्डी, आवळा गर साठवण, आवळा लोणचे, आवळा सरबत, आवळा सुपारी, आवळा मुरंबा, आवळा सिरप व स्क्वॅश आणि आवळा पावडर या विषयांवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विक्रम कड यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात मागील काळात झालेल्या विविध फळ प्रक्रियेवरील प्रशिक्षणांमधून स्वतःचे उद्योग सुरू करणार्या उद्योजकांची माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राहुल घुगे यांनी तर आभार डॉ. बाबासाहेब भिटे यांनी मानले. या प्रशिक्षणासाठी उद्योग विभागातील प्राध्यापक डॉ. जितेंद्र ढेमरे, प्रसारण केंद्राचे प्रमुख डॉ. पंडित खर्डे, कृषि माहिती तंत्रज्ञान केंद्राचे व्यवस्थापक डॉ. दत्तात्रय पाचरणे तसेच विविध जिल्ह्यातून आलेले वीस पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!