Disha Shakti

कृषी विषयी

पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे बळकटीकरण करून आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार- कृषिमंत्री मा. ना. माणिकराव कोकाटे, 17 वर्षानंतर ऊस संशोधन केंद्राला कृषि मंत्र्यांची भेट

Spread the love

राहुरी विद्यापीठ /  आर. आर. जाधव : ऊस उत्पादक शेतकर्यांची ऊसाची पंढरी समजल्या जाणार्या पाडेगावच्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे काम सर्वोत्कृष्ट आहे. या संशोधन केंद्राचे काम पूर्ण देशात प्रसारित असले तरी या केंद्राचे बळकटीकरण करून आंतरराष्ट्रीय स्तराचे केंद्र आपण बनविणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री मा. ना. अॅड. माणिकराव कोकाटे यांनी केले.

 महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रात कृषिमंत्र्यांचा शेतकरी व शास्त्रज्ञांशी सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना कृषिमंत्री मा. ना. अॅड. माणिकराव कोकाटे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष श्री. तुषार पवार, कृषि परिषदेचे महासंचालक श्री. रावसाहेब भागडे, द्राक्ष बागायतदार संघ अध्यक्ष श्री. कैलास भोसले, प्रगतिशील शेतकरी श्री. दिलीपराव शिंदे, प्रगतशील शेतकरी श्री. मधुकर कोकाटे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, विद्यापीठ अभियंता इजी. मिलिंद ढोके, ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे, सरपंच श्री. राहुल कोकरे उपस्थित होते.

 याप्रसंगी संवाद साधताना कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे पुढे म्हणाले की या संशोधन केंद्राला 94 वर्षे पूर्ण झालेले असून त्याचे बळकटीकरण करणे गरजेचे आहे. या संशोधन केंद्रामध्ये शेतकरीभिमुख आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन व्हावे यासाठी मी या संशोधन केंद्राला नवी प्रशासकीय इमारत, शेतकरी निवास व प्रशिक्षण केंद्र, कर्मचारी निवासस्थान, टिशू कल्चर प्रयोगशाळा, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रक्षेत्र कार्यालय उभारणीसाठी तत्वतः मान्यता देत आहे. या संशोधन केंद्राने उसाचे 86032, फुले 265, 15012, 15006, 13007 असे अनेक सरस वाण दिलेले आहेत. यापुढे या संशोधन केंद्राने कमी कालावधीचे व अधिक साखर उतारा देणारे वाण विकसित करावे.

ऊस पिकात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून लागवड खर्च कसा कमी करता येईल व उत्पादन व उत्पन्न कसे वाढेल यावर भर देणे गरजेचे आहे. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रक्षेत्र स्थापन करावे. शेतीमध्ये दिवसेंदिवस मजुरांची कमतरता भासत आहे. यासाठी ऊस शेतीत यांत्रिकीकरणावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. शासन शुगरकेन हार्वेस्टरसाठी शेतकरी उत्पादक कंपन्या व इतर गटांना 50 टक्के सबसिडी देत आहे. शेतकर्यांच्या मागणीनुसार कृषि विद्यापीठे आणि खाजगी कंपन्यांनी एकत्र येऊन ट्रॅक्टर ऑपरेटेड छोटे शुगरकेन हार्वेस्टर तयार करावे यामुळे अल्पभूधारक शेतकर्यांना फायदा होईल. शासनाचे नवीन कृषि धोरण, नवीन वाण शेतकर्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आपण गावपातळीवर डिस्प्ले बोर्ड लावून प्रचार व प्रसार करणार आहोत. जेणेकरून शेवटच्या शेतकर्यापर्यंत ही माहिती पोहोचेल.

आपण शेतकर्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने असे अॅड. करणार आहोत की ते शेतकर्यांना सांगेल कोणत्या पिकाची किती क्षेत्रावर लागवड झालेली आहे व आपण कोणते पीक घेतले पाहिजे. जेणेकरून मार्केटमध्ये आपल्या कृषि मालाला जास्त दर मिळेल. यामुळे पीक बदल पद्धतीलाही प्रोत्साहन मिळेल. शेतकर्यांना स्थानिक परिस्थितीवर आधारित हवामान सल्ला मिळावा यासाठी प्रत्येक गावात स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करणार आहोत. यामुळे शेतकर्यांना येणार्या नैसर्गिक आपत्तीचा अंदाज आधीच कळेल व त्यामुळे होणारे नुकसान टळेल. शासन खंबीरपणे शेतकर्यांच्या पाठीशी उभे आहे. यामुळे शेतकर्यांनी चिंता न करता आनंदाने शेती करावी. सन 2032 साली पाडेगाव संशोधन केंद्रास 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यापूर्वी शेतकर्यांसाठी सुसज्ज, सर्व सोयीने परिपूर्ण असे पाडेगाव ऊस संशोधन केंद्र आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलोकिक मिळविण्यासाठी सज्ज असेल असे प्रतिपादन त्यांनी केले .

 याप्रसंगी इंजि. मिलिंद डोके यांनी ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथील प्रस्तावित इमारतींचा आराखडा सादर केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत ऊस संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. राजेंद्र भिलारे यांनी केले. यावेळी त्यांनी ऊस संशोधन केंद्र स्थापनेपासून झालेल्या संशोधनाचा आढावा सादर केला. संशोधन केंद्राने विकसित केलेल्या उसाच्या वाणाखाली देशात 56% क्षेत्र व राज्यात 87% क्षेत्र आहे.

ऊस उत्पादक शेतकर्यांच्या उन्नतीमध्ये व साखर कारखान्यांच्या भरभराटीमध्ये ऊस संशोधन केंद्राचा सिंहाचा वाटा असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी शेतकरी श्री. गिरीश बनकर, श्री. सौरभ कोकीळ, श्री. कल्याण काटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शेतकरी म्हणाले की उसामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संशोधनाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. व्हीएसआयच्या धरतीवर पाडेगाव संशोधन केंद्राला दर टनामागे एक रुपया दिला तर ऊस संशोधन केंद्रात होणार्या संशोधनाला व संशोधन केंद्राच्या बळकटीकरणाला त्याचा फायदा होईल व तो फायदा अप्रत्यक्षपणे शेतकर्यांना होईल. ऊस संशोधन केंद्राचे बळकटीकरण झाल्यावर पाडेगावमध्ये ऊस पर्यटनाला मोठा वाव मिळेल. यामुळे तरुण शेतकरी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने शेती करतील. पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्र हे ऊस उत्पादक शेतकर्यांचे दैवत आहे. खाजगी नर्सरीतून ऊस रोपांमध्ये होणारी भेसळ थांबविण्यासाठी ते कॉलिटी कंट्रोलच्या अंतर्गत आणणे गरजेचे आहे. 

 याप्रसंगी उसावरील विविध प्रकाशनांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या संवाद कार्यक्रमांमध्ये कृषि विभागाचे अधिकारी, परिसरातील प्रगतशील शेतकरी, शास्त्रज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. दत्तात्रय थोरवे यांनी यांनी मानले.

 मागील 17 वर्षात प्रथमच कृषिमंत्र्यांनी ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे भेट दिल्यामुळे परिसरातील शेतकरी आणि शास्त्रज्ञ भारावून गेले. कृषिमंत्र्यांनी संपूर्ण दिवस शेतकर्यांशी संवाद साधला. त्यांच्या ऊस उत्पादनातल्या अडचणी जाणून घेतल्या. त्यामुळे शेतकर्यांनी कृषि मंत्र्यांचे कौतुक करून आभार मानले व पुन्हा ऊस बेणे वाटपाला कृषिमंत्र्यांना आमंत्रण दिले.*


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!