Disha Shakti

इतर

अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस दलात अंमलदारांच्या बदल्यांचे वारे, २८ फेब्रुवारीपर्यंत पसंतीच्या ठिकाणासह अर्ज सादर करण्याचे पोलीस अधीक्षकांचे आदेश

Spread the love

अहिल्यानगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तसेच श्रेणी पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील बदली पात्र पोलीस अंमलदारांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या (सन २०२५) करण्यात येणार आहेत. एका पोलीस ठाण्यात/शाखेत ३१ मे २०२५ पर्यंत पाच वर्ष पूर्ण होत असलेल्या पोलीस अंमलदारांची प्रशासकीय बदली करण्यात येणार आहे. तसेच एका पोलीस ठाण्यात/शाखेत तीन वर्ष पूर्ण झालेल्या पोलीस अंमलदारांना विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार आहे. प्रशासकीय व विनंती बदलीसाठी संबंधितांनी २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आहेत.

बदलीपात्र अंमलदारांनी पोलीस बदलीसाठी ठरवलेले निकष लक्ष्यात घेऊन अर्ज करण्याचे आदेशात नमूद केले आहे. एका पोलीस ठाण्यातील सेवा (खंडीत /अखंडीत) पाच वर्ष पूर्ण झाल्यास बदलीस पात्र राहील, एका तालुक्यात जास्तीत जास्त १२ वर्षे सेवा करता येईल, स्वग्राम असलेल्या तालुक्यात बदली दिली जाणार नाही, गुन्हे शाखा/ जिल्हा विशेष शाखा येथे पाच वर्षांपेक्षा अधिक सेवा देता येणार नाही. बदलीस पात्र पोलीस अंमलदारांनी आपल्या पसंतीचे ठिकाण नमूद करून विनंती अर्ज संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांकडे २८ फेब्रुवारी पर्यंत सादर करावा. परस्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात अर्ज सादर केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही.

दरम्यान प्रभारी अधिकारी यांनी अर्जदारांच्या माहितीची खातरजमा करून स्वाक्षरीसह अर्ज सादर करावेत, पोलीस ठाणे/शाखेस तीन वर्ष पूर्ण झालेले अंमलदारच विनंती बदल्यासाठी अर्ज करू शकतील. मागील वर्षी (सन २०२४) बदली स्थगिती मिळालेल्या अंमलदारांनीही अर्ज सादर करावा, ज्या अंमलदारांवर तक्रारी आहेत किंवा कार्यप्रदर्शन समाधानकारक नाही, अशांचा कसुरी अहवाल प्रभारी अधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत २८ फेब्रुवारी पूर्वी सादर करावा, असे आदेशात
नमूद केले आहे.

माहिती पाठविण्यास विलंब झाल्यास संबंधित प्रभारी अधिकारी राहणार जबाबदार

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ नुसार, पोलीस दलातील सर्वसाधारण बदल्या दरवर्षी करणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलीस अंमलदार यांनी विहित कालावधीत माहिती सादर करावी. कोणत्याही कारणास्तव माहिती पाठविण्यात विलंब झाल्यास जबाबदारी संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांची राहील, असे स्पष्ट आदेश अधीक्षक ओला यांनी दिली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!