विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : एवढं कोणासाठी जगता? आयुष्यभर पाप करून इस्टेट कमवायची मग देह गेल्यावर कमावलं काय?… त्यामुळे देहाला सांभाळा देह गेल्यावर आपल्याला कोणीच विचारणार नाही. तीन वर्षाच्या मुलाला बापाच्या पिंडाला तेल वहावे लागते ही दारुमुळे निर्माण झालेली शोकांतिका आहे. दारूमुळे संसार उध्वस्त होत असल्याचे भाष्य करुन, तीव्र शब्दात ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी व्यसनाच्या आहारी जाणार्यांचा समाचार घेतला.
पारनेर तालुक्यातील आदर्श गाव टाकळीढोकेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या किर्तनात कौटुंबीक व्यवस्थेवर मार्गदर्शन करताना इंदोरीकर महाराज बोलत होते.या धार्मिक सोहळ्याला पहिल्या दिवसापासूनच भाविकांची उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. वैकुंठवासी हभप गुरुवर्य बबन महाराज पायमोडे यांच्या कृपाशीर्वादाने तर गुरुवर्य हभप विकासानंद महाराज मिसळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या सप्ताहाला किर्तनासाठी टाकळी ढोकेश्वर गावासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने हजर होते. पुढे बोलताना निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी दारुच्या आहारी गेलेल्या कर्ता पुरुषाच्या कुटुंबातील दाहक वास्तवता मांडली. तर दारू पिणार्यांनी, पाजणार्यांनी व सवय लावणार्यांनी भानावर येण्याचे सांगितले.
आजच्या कुटुंबव्यवस्थेवर बोलताना आजी आपल्या नातवाला मांडीवर खेळवू शकत नाही. मुली लायकी नसलेल्या मुलांच्या प्रेमात पडून जीवन उध्वस्त करत असल्याचे किर्तनातून त्यांनी परखड मत मांडले.
सप्ताह कमिटीच्या वतीने निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचा गुलाब पुष्प आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच व सर्व सदस्य,सोवा सोसायटीचे चेअरमन व संचालक, भजनी मंडळ व ग्रामस्थ तसेच दत्त सप्ताह कमेटी तसेच तरुण वर्ग परिश्रम घेत आहेत.समाजात वाढती गुन्हेगारी चिंताजनक बनली आहे. आपल्या मुलांबाबत पालकांनी काळजी घेतली पाहिजे. आपल्या मुलाला चांगला आहार आणि चांगली संगती गरजेची आहे. ती राहिली तरच गुन्हेगारी आटोक्यात येईल, सोळा – सतरा वर्षांची पोर गुन्हेगार बनत आहेत. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या लहान मनावर बिंबवावे , राजकारणी लोकांपासून तरुणांनी सावध राहा,नोकरीच्या भरवशावर बसू नका. व्यवसाय करा, व्यवसायाची लाज बाळगू नका. तरुणांनी व्यसनाच्या आहारी जाण टाळावं,अशा अनेक विषयांवर यावेळी कीर्तन सेवेतून इंदोरीकर महाराज यांनी प्रकाश टाकला. टाकळी ढोकेश्वर गावच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे कौतुक करत त्यांनी गावच्या कार्यक्रम नियोजनाचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
पाप करून इस्टेट कमवायची मग देह गेल्यावर कमावलं काय?. देहाला सांभाळा – ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर), टाकळी ढोकेश्वरच्या हरिनाम सप्ताहात हजारो भाविकांच्या उपस्थितीत रंगला इंदोरीकर महाराजांचे किर्तन

0Share
Leave a reply