प्रतिनिधी/वसंत रांधवण-पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील रहिवासी प्राथमिक शिक्षक दत्तात्रय चौरे यांना संगमनेर येथील संगमनेर इनर व्हील या संस्थेच्या वतीने राष्ट्रबांधणीचे शिल्पकार हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
टाकळी ढोकेश्वरचे रहिवासी असलेले दत्तात्रय चौरे हे पारनेर तालुक्यातील जिल्हा प्राथमिक शाळा बनाईवस्ती टाकळीढोकेश्वर येथील शाळेत कार्यरत आहेत.सन २०२१ पासून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी नेहमी पुढाकार घेतला आहे. नियमित शिक्षणाबरोबरच सामाजिक, धार्मिक तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठीही चौरे हे नेहमी प्रयत्नशील असतात. त्यांच्या या कामाचा गौरव म्हणून संगमनेर इनर व्हील या आंतरराष्ट्रीय संस्थेने त्यांना हा पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले.
दत्तात्रय चौरे यांना या वर्षातील चौथा पुरस्कार आहे. नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर, काजळे ज्वेलर्सचे ज्ञानेश्वर काजळे,इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा वृषाली कडलग, अर्चना मालपाणी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून समाजसेवेचा प्रयत्न केला जातो. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राष्ट्र बांधणीच्या कामात मोलाची साथ देणाऱ्या प्रयोगशील शिक्षकांना प्रोत्साहन देण्याचा या संस्थेचा प्रयत्न असतो. यंदाच्या पुरस्कारासाठी टाकळी ढोकेश्वर येथील रहिवासी दत्तात्रय चौरे यांची निवड करण्यात येऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार निलेश लंके, सरपंच अरुणा खिलारी, मा.सिताराम खिलारी सर, शाहीर शांताराम किनकर, शाळा व्यवस्थापन समिती बनाईवस्ती, टाकळी ढोकेश्वर ग्रामस्थ तसेच अविनाश पारखपद मंडळ व नातेवाईकांनी चौरे यांचे अभिनंदन केले.
पुरस्कारामुळे आपली जबाबदारी वाढली असून शिक्षक म्हणून काम करताना सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी या पुरस्कारामुळे उर्जा मिळाल्याचे शिक्षक दत्तात्रय चौरे यांनी सांगितले
Leave a reply