प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (दि.12 मे) अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांनी सोनईत आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली.शिवसेनेत फुट पडली त्यावेळी शंकरराव गडाख हे ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे राहिले होते. याबद्दल बोलताना ठाकरे म्हणाले, “पाठीराखा म्हणून दिलेली साथ राजकीय जीवनाला उर्जा देणारी आहे. गडाखांचा पाठीराखापणा विसरणार नाही”, असे गौरोद्गार त्यांनी काढले.
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, “शिवसेना पक्षाच्या संकटसमयी आमदार शंकरराव गडाख यांनी पाठीराखा म्हणून दिलेली साथ राजकीय जीवनाला उर्जा देणारी आहे. खांद्याला खांदा देणारा खंदा समर्थक दिला म्हणून तर जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचा आशीर्वाद घेवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राजकारणाच्या पलीकडे आमचे असलेले जीवाभावाचे नाते असेच जपले जाईल”, असं ठाकरे यावेळी म्हणाले.
लढवय्या सैनिक माझ्या सोबतीला दिल्याबद्दल दीड वर्षांपासून जेष्ठ नेते गडाखांची भेट घेऊन आभार मानायचे होते. आज तो योग जुळून आल्याचे सांगून ठाकरे यांनी गडाखांच्या कार्यकर्तृत्वाचे कौतुक केले. तसेच सत्तासंघर्षाच्या निकालावर मुंबईत बोललो असल्याने राजकीय प्रश्न नको असे त्यांनी सांगितले.
ठाकरे गडाख वस्तीवर आल्यानंतर जेष्ठ नेते गडाख व त्यांच्यात कालच्या निकालावर चर्चा झाली. न्यायालयीन संघर्ष मी सुध्दा अनुभवला असल्याने खचून न जाता अधिक जोमाचे काम सुरुच ठेवा, असे गडाख यांनी ठाकरे यांना सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीच्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला.दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आज गडाख यांची भेट घेतली. याआधी त्यांनी शनिशिंगणापूरला भेट देवून शनिदर्शन घेतले. यावेळी त्यांच्याबरोबर रश्मी ठाकरे व मिलिंद नार्वेकर हे देखील उपस्थित होते.