विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथे रात्री १ च्या सुमारास येथील संदिप जगताप यांच्या राहत्या घराजवळ उभा केलेल्या नव्या सोनालिका कंपनीच्या ट्रॅक्टरची नवी कोरी बॅटरी अज्ञात चोरट्याने रात्री एक ते पहाटेच्या सुमारास चोरून नेल्याची घटना घडली असून यासह निमगाव खैरी येथील अँड. दिनेश पुंड यांच्या देखील ट्रॅक्टरच्या बॅटरीची अज्ञात इसमाने चोरी केली असून अशा बॅटरी चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी वाहन चालकासह शेतकऱ्यांमधून होत आहे.
सविस्तर वृत्त असे कि, येथील शेतकरी संदीप जगताप यांच्या मेव्हण्याचा सांयकाळचा बेलापूर येथे साखरपुड्याचा कार्यक्रम असल्यामुळे ते मुक्कामी तेथेच थांबले होते.अज्ञात चोरट्याला घरी कोणी नसल्याची माहिती असल्याने चोरट्याने घरासमोर उभा असलेला सोनालिका कंपनीचा नव्या ट्रॅक्टरला असलेली बॅटरी रात्रीच्या सुमारास चोरून नेली. सकाळी ट्रॅक्टर चालक आला असता ट्रॅक्टरला चावी लावून देखील ट्रॅक्टर चालु न झाल्याने शेतकरी श्री. जगताप यांच्याशी चालकाने संपर्क साधुन ट्रॅक्टरची बॅटरी चोरीला गेल्याचे सांगितले.
त्यांच्यासह निमगाव खैरी येथील प्रगतशील शेतकरी तसेच वकील दिनेश पुंड हे रात्री तीनच्या सुमारास गाढ झोपेत असताना अवघ्या तीन ते साडेतीन फुटावर लावलेल्या ट्रॅक्टरची बॅटरी देखील अज्ञात चोरट्याने चोरून नेली ॲड. दिनेश पुंड हे जागरूक झोपेत असतात, मात्र त्यांच्यावर एखाद्या स्प्रे किंवा अत्तर चा वापर केला गेल्याचा संशय त्यांना असून अवघ्या तीन फुटावर उभा असलेल्या ट्रॅक्टरची बॅटरी चोरी गेली हे विशेष. या चोरट्यांना त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी नाऊर येथील शेतकऱ्यांसह निमगाव खैरी येथील नागरिकांमधून होत आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी या परिसरामध्ये अशाच पद्धतीने स्प्रिंकलर,मोटारी,विद्युत केबल, यासह इतर भुरट्या चोरांनी उच्छाद मांडला होता. तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे या चोरांवर वचक बसवण्यात यश आले. मात्र पुन्हा एकदा आता या बॅटरी चोरांनी धुडघुस घालायला सुरुवात केली असून यांचा बंदोबस्त पोलीस उपधिक्षक संदीप मिटके यांनी करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
नाऊर व निमगांव खैरी येथे उभ्या असलेल्या नव्या ट्रॅक्टरच्या बॅटरीची चोरी – चोरांना आवर घालण्याची मागणी

0Share
Leave a reply