श्रीरामपुर प्रतिनिधी / जितू शिंदे : साहेब मला रेशनकार्ड मिळत नाही. साहेब, मला रेशन कार्ड हाये…पण धान्य मिळत नाही. मॅडम, मला संजय गांधीचे पैसे मिळंना. माझ्या मुलांचं बालसंगोपनचं प्रकरण करायचंय. काय करावं लागंल?’,असा तक्रारींचा पाऊस सुरू होता. त्यासोबतच आलेल्या महिलांच्या तक्रारींची सोडवणूक व समाधान करण्याचा प्रयत्न अधिकारी, प्रशासनाकडून सुरू होता.
हे चित्र होतं मंगळवारी श्रीरामपूरच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचं.२४८ महिलांनी शिबिराचा लाभ घेतला. आमदार लहू कानडे अध्यक्षस्थानी होते. गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, मिशन वात्सल्य शासकीय समितीचे अशासकीय सदस्य मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब जपे, अर्जुन राऊत, मनीषा कोकाटे, श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, तालुका संरक्षण अधिकारी दीपाली भिसे यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. तहसील, पंचायत समितीचा एकात्मिक बालविकास सेवा योजना विभाग व मिशन वात्सल्य समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रभारी बालविकास प्रकल्पाधिकारी शोभा शिंदे यांनी प्रास्ताविकातून शिबिराच्या आयोजनाविषयीची भूमिका सांगितली. राज्य सरकारच्या विविध योजनांची महिलांना माहिती मिळावी, यासाठी शिबिरात विविध शासकीय विभागांची दालने लावण्यात आली होती.
या दालनातील अधिकारी, कर्मचारी महिलांना सरकारी योजनांची माहिती देत होते. अनेक महिलांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळविण्यासाठी काय करावे लागेल? याची माहिती विचारताना दिसत होत्या. नायब तहसीलदार चारूशिला मगरे-सोनवणे यांनी संबंधितांना निर्देश देत महिलांच्या तक्रारी जागेवरच सोडविण्याचा प्रयत्न केला.
यावेळी बोलताना आ. कानडे यांनी अशाप्रकारचे शिबीर फक्त एक दिवस न घेता गावनिहाय अशी शिबिरे घेण्याची सूचना गटविकास अधिकाऱ्यांना केली. तर नगरपालिका हद्दीतील महिलांसाठी नव्याने स्वतंत्र समाधान शिबीर घेण्याचे निर्देश मुख्याधिकाऱ्यांना दिले. अतिक्रमित जमिनी नियमानुकूल करण्याचे जुने शासन आदेश असताना त्याची अंमलबजावणी होत नाही. दुसरीकडे घरकुलांचेक्ष उद्दिष्ट असूनही यंत्रणांच्या समन्वयाअभावी लाभार्थी घरकुलापासून वंचित राहत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यांनी सर्व दालनांना भेटी देऊन माहिती घेतली. विशेष शिक्षिका वर्षा दातीर यांनी सूत्रसंचालन केले.
प्रमुख कारभारीच गैरहजर
या शिबिराचे आठवडाभरापासून नियोजन झाले होते. त्यानुसार आपल्या समस्या, प्रश्न सुटून आपले समाधान होईल, या आशेने ग्रामीण भागातील महिला एक दिवसाची रोजंदारी बुडवून शिबिरासाठी आल्या होत्या. पण प्रांताधिकारी किरण सावंत, प्रभारी तहसीलदार राजेंद्र वाकचौरे, नायब तहसीलदार ज्योती गुंजाळ हे महसूल विभागाचे कारभारी असलेले प्रमुख अधिकारी तसेच तालुका आरोग्याधिकारी डॉ. राजश्री देशमुख हे गैरहजर होते. त्यांच्या गैरहजेरीत नायब तहसीलदार चारूशिला मगरे-सोनवणे, प्रभारी बालविकास प्रकल्पाधिकारी शोभा शिंदे या दोघींनाच शिबिराचे सारथ्य करावे लागले.
श्रीरामपुरात तक्रारींचा पाऊस ; साहेब, मला धान्य मिळत नाही, मला अनुदान नाही ; समाधानासाठी महिलांची शिबिरात गर्दी

0Share
Leave a reply