धाराशिव प्रतिनिधी / विजय कानडे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक साक्षरता दिनानिमित्त आदिवासी पारधी समाजाला साक्षरता व जनजागृती कायदेविषयक मार्गदर्शन करताना, “पहिली पिढी तुम्ही साक्षर बनवा,दुसरी पिढी आपोआप साक्षर होईल” असे जिल्हा विधी प्राधिकरण अध्यक्षा व जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रमुख अंजू शेंडे यांनी बोलताना सांगितले.
बुधवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी राजलक्ष्मी मंगल कार्यालय गोवर्धन वाडी येथे जागतिक साक्षरता दिनानिमित्त पारधी समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यातआली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधि सेवा प्राधिकरण व जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रमुख अंजू शेंडे या होत्या तर धाराशिवचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश, जिल्हा न्यायाधीश आर .एस गुप्ता, तहसीलदार शिवानंद बिडवे, जिल्हा शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे व गटविकास अधिकारी बी. आर ढवळशंख यांची प्रमुख उपस्थिती होती.आदिवासी पारधी समाजाने गुन्हेगारी पार्श्वभूमी सोडण्याची शपथ घेऊन साक्षर होऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा तसेच धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने आदिवासी समाजासाठी मोफत मिलिटरी भरती ट्रेनिंग व पोलीस भरती ट्रेनिंग देण्यात येत आहे. तरुणांनी सहभाग नोंदवून शासकीय नोकऱ्या मिळविण्यासाठी प्रयत्न करावे असे मत धाराशिवचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
यावेळी ढोकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत माजी पंचायत समिती सदस्य संग्राम भैया देशमुख, निहाल काझी, पोलीस पाटील, सुभाष कदम पाटील आदिवासी पारधी समाजाच्या महिला व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Leave a reply