Disha Shakti

Uncategorized

जिल्हा परिषदेचे शिक्षक पोलिसांच्या रडावर : लग्न झालेल्या शिक्षिकेने केले मोठे कांड..

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : जिल्हा परिषदेच्या शिक्षिकेने घटस्फोट झाला असल्याने आता येथे राहणे शक्य नाही म्हणून बदली घेतली. मात्र, ज्याच्यासोबत घटस्फोट घेतला असल्याचे शिक्षिकेने सांगितले त्याच्यासोबत संसार सुखाने सुरू असल्याचे समोर आले आहे. बदलीसाठी घटस्फोटाचा बनाव करणाऱ्या महिला शिक्षिकेची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे कोतवाली पोलिसांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकार्‍यांकडे पाच वर्षांतील शिक्षक बदलीचे रेकॉर्डच मागितल्याने खळबळ उडाली आहे.फक्त घटस्फोटाचा बनाव करणाऱ्याच नाही तर अपंगत्व नसताना दिव्यांग असल्याचे दाखले देत बदली घेणारे तसेच खोटी कारणे दाखवून बदलीसाठी अर्ज करणारे देखील पोलिसांच्या रडावर आले  आहेत.

आंतर जिल्हा बदलीअंतर्गत 2017 ते 2022 या पाच वर्षात बनावट दाखले दिल्याचे सांगितले जाते. याबाबत जिल्हा परिषदेकडे अनेक संस्था व संघटनांनी चौकशीची मागणी केली होती. मात्र, राजकीय दबावाने ती झालीच नाही.आता याबाबत पोलिस अधीक्षकांकडे विकास गवळी (रा. भिस्तबाग, अहमदनगर) यांनी तक्रार केली.पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी चौकशी सुरू केली आहे.

जिल्हा परिषद शिक्षणाधिकार्‍यांना पत्र पाठवून 2017 ते 2022 या काळात संवर्ग एकमधून आंतरजिल्हा बदलीवरून हजर झालेल्या शिक्षकांच्या नावांची यादी व बदलीचे कारण याची माहिती देण्याचे सांगितले आहे. जिल्हा परिषदेमध्ये आंतर जिल्हा बदली अंतर्गत झालेल्या बदल्यांमध्ये अपंगत्वाचे तसेच घटस्फोटाचे खोटे दाखले सादर करून बदली करून घेणार्‍या शिक्षक व शिक्षिका यांची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी, अशी तक्रारदार गवळींची मागणी आहे.

याच मागणीच्या अनुषंगाने कोतवाली पोलिसांनी शिक्षण विभागाकडून माहिती मागवली आहे. गवळी यांनी धाडस करून याबाबत पुढाकार घेतला व थेट जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करून त्यात संशयितांची नावे देखील त्यांनी दिली. त्यावरून अशा दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी त्यांनी मागणी केली. या मागणीची दखल घेताना पोलिसांनी सुरू केलेल्या चौकशीच्या कारवाईमुळे बोगस पद्धतीने बदल्या करून घेणार्‍या शिक्षकांमध्ये घबराट पसरली आहे.

परित्यक्तांची ही होणार चौकशी परित्यक्ता जिल्हा अंतर्गत बदल्यांमध्ये देखील काही महिला शिक्षिकांनी परित्यक्ता असल्याचे खोटे दाखले दिले. या दाखल्यांच्या आधारे त्यांनी बदल्या करून घेतल्या. अशा महिला शिक्षिका आजही आपल्या नवरोबांबरोबर राहात आहेत. त्यांचीही तक्रार होणार असल्याचे समजते आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!