श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : मागील काही दिवसांपासून श्रीरामपूर नगरपालिका वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असून गेल्या महिन्यात नगरपालिकेच्या गेटवर झालेल्या दोन ठेकेदारांच्या हाणामारीनंतर काल पुन्हा नगरपालिकेत दोन कर्मचार्यांमध्ये जुंपल्याची घटना घडली. याबाबत समजलेली अशी की, नगरपालिकेचे लेखापाल आणि या पालिकेतील माजी अभियंता जे सध्या दुसर्या पालिकेत आहेत, यांच्यामध्ये शाब्दिक चकमकी वरून थेट धराधरी झाली. संबंधित अभियंता हे पुर्वी श्रीरामपूर येथे कार्यरत होते. व या महिन्याअखेर ते निवृत्त होणार असल्याने त्यांना आता ना देय दाखल्याची आवश्यकता आहे. याबाबत त्यांनी लेखापालांशी संपर्क साधला. परंतु त्यांच्या काळातील काही कामाबाबत लेखापरीक्षणामध्ये आक्षेप असल्याने सदरची आक्षेप दुरुस्त करून दिल्यानंतरच ना देय दाखला देण्यात येईल, असे लेखापाल यांनी त्यांना सांगितले.
यावरून त्यांचा राग अनावर झाला व शाब्दिक वाद थेट एकमेकाला धरण्यापर्यंत गेला. त्या ठिकाणी महिला कर्मचारी देखील होत्या. वाद वाढल्यानंतर उपस्थित इतर कर्मचार्यांनी मध्यस्थी केल्यानंतर दोघांना एकमेकांपासून बाजूला करण्यात आले. मुख्याधिकारी सोमनाथ जाधव हे पालिकेत नसल्याने ते आल्यानंतर याबाबत त्यांच्याकडे सदर कर्मचारी तक्रार करणार असल्याचे समजते. सध्या श्रीरामपूर नगरपालिका दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार लहु कानडे यांनी मुख्याधिकार्यांची कानउघडणी करून नगरपालिकेच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली होती.
सध्या पालिकेत कर्मचार्यांचे दोन गट पडल्याची चर्चा असून मुख्याधिकार्यांनी एका गटाला जवळ करून सर्व कामे त्यांना विभागून दिली आहे. तर काही अधिकारी कर्मचार्यांना कामच नाही. अशी परिस्थिती आहे. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेण्यास कोणालाही सवड नाही. त्यामुळे श्रीरामपूर नगरपालिकेची जन माणसातील प्रतिमा मलीन झाली आहे. जिथे कर्मचार्यांचीच कामे होत नाही तिथे सर्वसामान्यांची काय गत ? असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.
Leave a reply