Disha Shakti

राजकीय

श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय व्हावे या मागणीसाठी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्यावतीने कडकडीत बंद!

Spread the love

श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार  : अहमदनगरचे विभाजन झाल्यानंतर श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय व्हावे, या मागणीसाठी आज स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने बंदची हाक देण्यात आली होती. श्रीरामपुरातील व्यावसायिकांनी आपापले व्यवसाय बंद ठेवून श्रीरामपूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामुळे आज सकाळपासूनच मार्केटमध्ये शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे.

गेल्या ४० वर्षापासून श्रीरामपूर जिल्हा निर्मितीचा विषय प्रलंबित आहे. यासाठी अनेक आंदोलने, निवेदने, सह्यांची मोहीम आदी आंदोलने प्रभावीपणे राबविण्यात आली. परंतु, अद्यापही शासनाचे या मागणीकडे लक्ष गेले नाही. श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने बंदची हाक देण्यात आली होती. त्यास श्रीरामपूर येथील नागरिकांनी तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी यास पाठिंबा दर्शवत बंद यशस्वी केला.

अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा असून त्याचं क्षेत्रफळ १७४१२ चौ. किमी आहे. हा जिल्हा तसा दोन भागांत विभागला आहे, उत्तर नगर जिल्हा आणि दक्षिण नगर जिल्हा. गोवा राज्यापेक्षा पाचपट क्षेत्रफळ असलेला अहमदनगर जिल्हा आहे. त्याच्या विभाजनाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. यात श्रीरामपूर शहरातील नागरिक सर्वाधिक आग्रही राहिले आहेत. उत्तर नगर जिल्ह्यात अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासे हे तालुके येतात. यात भौगोलिक मध्य हा श्रीरामपूर तालुका येतो. त्यामुळे राज्य सरकार यावर काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!