Disha Shakti

राजकीय

छगन भुजबळ आज घेणार मंत्रिपदाची शपथ,समता परिषदेचे कार्यकर्ते मुंबईला रवाना 

Spread the love

विशेष प्रतिनिधी अहिल्यानगर / वसंत रांधवण : आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, अशी मोठी बातमी आता समोर येत आहे. राज्याच्या राजकारणात छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून बॅक फूटवर आले होते. मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ यांनी वारंवार आपली नाराजी व्यक्त देखील केल्याचं बघायला मिळालं होतं. यानंतर आता छगन भुजबळ यांचं आता पक्षाकडून राजकीय पुनर्वसन होताना दिसत आहे. राज्याच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाचा महत्त्वाचा चेहरा म्हणून छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी दिली जात असल्याची चर्चा आहे.

राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी याबाबत महत्त्वाचं परिपत्रक देखील जारी केलं आहे. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाच्या सदस्यांचा शपथविधी समारंभ आयोजित केल्याची माहिती या परिपत्रकात जारी करण्यात आली आहे. मुंबईत राजभवन येथे हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मोजक्याच ५० जणांना निमंत्रण असणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे.

 

चौकट:: छगन भुजबळांना कोणतं खातं मिळणार?

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. स्वतः भुजबळ साहेबांनी नाराजी व्यक्त केली होती. या दरम्यान, भुजबळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात दुरावा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मधल्या काही काळात भुजबळ जेष्ठ नेते शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील की काय, अशी चर्चा होती. पण नंतर काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांचं अजित पवार यांच्यासोबत मनोमिलन झाल्याची देखील माहिती समोर आली. अखेर अजित पवारांनी भुजबळांना मंत्रीमंडळात स्थान देवून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. भुजबळ सकाळी १० वाजता मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. 

समता परिषदेचे कार्यकर्ते मुंबईला रवाना 

छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाची वार्ता कळताच नाशिकसह महाराष्ट्रातील भुजबळ समर्थक मुंबईकडे रवाना झाले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी मतदार आपल्यासोबत राहण्यासाठी महायुतीकडून आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भुजबळ यांना मंत्रिपद देऊन खेळी खेळल्याची चर्चा आहे. धनंजय मुंडे यांच्या रुपाने ओबीसी नेतृत्व या आधी मंत्रीमंडळात होतं. पण त्यांच्या राजीनाम्यानंतर आता छगन भुजबळांच्या रुपाने ओबीसी नेता मंत्रीमंडळात असणार आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!