दिशाशक्ती प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान दरवर्षी १ जानेवरीला न चुकता नववर्षाच्या स्वागताला सहकुटुंब शनिदर्शनासाठी येतात. गेल्या १५ वर्षांपासून त्यांचा दरवर्षी त्यांचा क्रम चालू आहे. १ जानेवारी २०१० रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना शिवराजसिंह चौहान हे शनिदर्शनासाठी आले होते. यावर्षी उसाच्या शेतात वंजारवाडी येथे बैलांच्या साहाय्याने लाकडी चरकावर काढल्या जाणाऱ्या कैलास आव्हाड यांच्या रसवंतीला ते भेट देतात. त्याप्रमाणे यंदाही आव्हाड यांच्या रसवंतीला भेट देऊन रसाची गोडी चाखली.
१ जानेवारीला रसवंतीगृह चालक आव्हाड यांचा वाढदिवसही मंत्री चौहान यांनी साजरा केला. दरवर्षी शनिदर्शनाला आल्यावर रसवंतीला भेट देणार असल्याचे सांगितले होते. सन २०१० ते २०२५ असे दरवर्षी नवीन वर्षात शनिदर्शनासाठी आल्यावर आव्हाड यांच्या रसवंतीला चौहान भेट देतात.चौहान यांच्या प्रेमापोटी आव्हाड यांनी रसवंतीला मामा रसवंती असे नाव दिले. गुरुवारी २ जानेवारी रोजी केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांनी आव्हाड यांच्या रसवंतीला भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत फटाके फोडून व औक्षण करून करण्यात आले. त्यांनी मंत्रीपदाचा डामडौल बाजूला सारत लाकडी चरक्यावरील राजा नावाच्या खिलारी बैलाला दटवून स्वतःच्या हाताने चरकात ऊस घालून रस काढला. स्वतः रसाची गोडी चाखत कुटुंबीय व ताफ्यातील कर्मचारी यांनाही प्रेमाने उसाचा रस चाखायला दिला.
रसवंतीगृह चालक कैलास आव्हाड यांचा केक कापून वाढदिवस साजरा केला. आव्हाड कुटुंबियांशी मराठीत संवाद साधला. आव्हाड यांच्या आई नर्मदाबाई यांचे दर्शन घेतले. रसवंतीचालक कैलास आव्हाड, भीमाबाई आव्हाड, मुले संकेत, सचिन यांनी यावेळी कृषिमंत्री चौहान, पत्नी साधना चौहान, मुलगा कुणाल यांचा सत्कार केला. याप्रसंगी वंजारवाडीचे सरपंच महादेव दराडे, रामकिसन दराडे, हनुमंत दराडे आदी उपस्थित होते.
आव्हाड यांना दिले मुलाच्या लग्नाचे निमंत्रण केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांचा मुलगा कुणाल चौहान यांचा विवाह १४ फेब्रुवारी २०२५ रोजी आहे. कृषिमंत्री चौहान यांनी मुलाच्या विवाहाचे निमंत्रण कैलास आव्हाड यांना दिले. या विवाहाला सहकुटुंब उपस्थित रहावे, असा आग्रह केला.
केंद्रीय कृषी मंत्र्यांना लागली शनीशिंगणापुर रस्त्यावरील लाकडी चरक्यावरील उसाच्या रसाची गोडी, मागील 15 वर्षांपासून वंजारवाडी येथील रसवंतीला देतात भेट, रसवंतीचालकाने रसवंतीला दिले मामा नाव

0Share
Leave a reply