वाहतूक पोलीस नसल्यामुळे अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुक कोंडी
धाराशिव प्रतिनिधी/ विजय कानडे: धाराशिव तालुक्यातील तेर वैराग्य महामेरू, संत परीक्षक श्री. संत गोरोबा काकांची पावन भूमी आहे. आज बुधवार दिनांक 18 जानेवारी रोजी षटतीला एकादशी आहे. मकर संक्रांती नंतर येणारी ही पहिली एकादशी आहे म्हणून याच एकादशीला तिळगुळाची एकादशी असेही म्हटले जाते. त्यामुळे भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. काकांच्या दर्शनासाठी तेर परिसरासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे मंदिर परिसरात तेरणा नदी काठापर्यंत पहाटे पासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तसेच विविध गावच्या पायी दिंड्याही गोरोबा – ज्ञानोबा -तुकोबा नामाचा व टाळ मृदंगाचा गजर करत भगवा पताका घेऊन काकांच्या दर्शनासाठी तेरणातीरी दाखल झाल्या होत्या . तेरमध्ये भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाल्यामुळे वाहतूक पोलीसांचे नियंत्रण नसल्याने विविध ठिकाणी वाहने अस्ताव्यस्त उभी केल्यामुळे भाविक भक्तांना येण्या-जाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागला. षटतीला एकादशी निमित्त भावीक मोठ्या प्रमाणात तेर मध्ये दाखल होत असल्यामुळे सर्वच पक्षाच्या गाव पुढाऱ्यांनी वाहतूक पोलीस व मंदिर प्रशासकानी एकादशीला वाहनतळ उभा करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून मागणी होत आहे.