प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : संगमनेर तालुक्यातील वडदरा (बोटा) येथील उत्तम बाळाजी कुऱ्हाडे (वय ६२) या घरात टीव्ही पाहत बसलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री आठ वाजता ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. मात्र, तपासात त्यांचा मृत्यू धारदार शस्त्राने वार केल्यामुळे झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने वेगळाच संशय निर्माण झाला आहे. सुरुवातीला बिबट्याचा हल्ला झाल्याचे सांगण्यात आल्याने वन विभागाने आवश्यक ती प्रक्रिया केली, आता पोलिसांकडून तपास सुरू झाला आहे.
बोटा-अकलापूर रोडवरील वडदरा येथील राहिवाशी असलेले उत्तम कुऱ्हाडे घरात नेहमीप्रमाणे टीव्ही पाहत होते. घराचा दरवाजा उघडा असल्याने जवळील शेतातून बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. यात त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती वन विभागाला कळवण्यात आली. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रविवारी दुपारी अंत्यसंस्कारही करण्यात आले. मात्र, शवविच्छेदन अहवालात जखमा धारदार शस्त्राच्या असल्याचे आढळल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. आता पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
कुऱ्हाडे अविवाहित आहेत. त्यांच्यामागे ८० वर्षांची आई आहे. जमीन विकण्याचा त्यांचा विचार होता. अलीकडेच त्यांनी दोन लाख रुपयांचे कर्जही काढले होते, असे पोलिस चौकशीत आढळले आहे. त्यामुळे हा बिबट्याचा हल्ला आहे. की कोणत्या तरी उद्देशाने खून, याचा तपास करण्यात येत आहे.
वन विभागाला सांगितले बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये आढळलं भलतच

0Share
Leave a reply