विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार : श्रीरामपुरात 4 लाखांचा गुटखा पकडला शहरात गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखू विक्रेत्याविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली असून सुमारे 4 लाख 14 हजार 692 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. भरत ताराचंद संघवी (रा. मोरगेवस्ती, श्रीरामपूर) असे ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेतील पथक श्रीरामपूर शहरात अवैध धंद्याची माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना शहरातील नॉदर्न ब्रँच, वॉर्ड नं 7 भागात भरत संघवी याने त्याच्या घराच्या पाठीमागील पत्र्याच्या खोलीमध्ये गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू व सुपारी बेकायदेशिरपणे चोरून विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे छापा टाकला. त्यावेळी त्याठिकाणी एक इसम मिळून आला. त्याला नाव विचारले असता भरत ताराचंद संघवी (वय 48, रा. मोरगेवस्ती, वॉर्ड नं 7, श्रीरामपूर) असे सांगितले.
पथकाने त्याच्या मालकीच्या बंद पत्र्याच्या रुमची झडती घेतल्यानंतर तेथे 1 लाख 43 हजार 748 रुपये किंमतीचा केसरयुक्त विमल पानमसाला, 7 हजार 744 रुपयांचा व्ही 1 तंबाखूचे एकूण 352 पुडे, 1,02,240 रुपये किंमतीचा हिरा पानमसालाचे 852 पुडे, 26550 रुपये किंमतीची रॉयल 797 तंबाखुचे 885 पुडे, 62080 रुपयांचा राजनिवास पानमसालाचे 485 पुडे, 1560 रुपयांचे प्रिमीयम जेड एल- 01 जाफरानी जर्दा तंबाखूचे 52 पुडे, 1050 रुपयांचा गोवा गुटखा, 24600 रुपयांचे रजनीगंधा पानमसाला कंपनीचे बॉक्स तसेच एम तंबाखू पुडे असा एकूण 4 लाख 14 हजार 692 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने त्यास मुद्देमालासह ताब्यात घेतले.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुरनं. 122/2023 भादंवि कलम 328, 272, 273, 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुद्देमाल व आरोपीस पुढील कारवाईसाठी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला हजर केले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवंत शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील पोहेकॉ मनोहर गोसावी, पोहेकॉ अतुल लोटके, पोना गणेश भिंगारदे, पोना ज्ञानेश्वर शिंदे, पोना संदीप दरंदले आदींनी केली.
Leave a reply