Disha Shakti

राजकीय

निकालाआधी घडामोडींना वेग, वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, शिंदे-फडणवीस-पवार यांच्यामध्ये तासभर चर्चा

Spread the love

दिशाशक्ती न्यूज नेटवर्क : शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाआधी घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये काल मंगळवारी मध्यरात्री महत्वाची बैठक झाल्याची माहिती मिळाली आहे. शिवसेना पक्षफुटीनंतर निर्माण झालेल्या ऐतिहासिक राजकीय पेचावर आज बुधवारी ता. १० रोजी सायंकाळी चार वाजता निकाल दिला जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता ‘शिवसेना कोणाची’ आणि ‘ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार की शिंदे गटाचे?’ याचा फैसला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी चार वाजल्यानंतर सुनावणार आहेत. त्याआधीच घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये काल मंगळवारी मध्यरात्री महत्वाची बैठक झाल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीत तिन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे. त्याचबरोबर या बैठकीसाठी राज्याच्या नवीन पोलीस महासंचालक रश्मी शुल्का देखील उपस्थित असल्याची माहिती आहे. तर या बैठकीमध्ये आज योणाऱ्या शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकालानंतर राज्यात कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. याबाबतचे वृत्त सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये संघर्ष होऊ नये, शांतता रहावी यासाठी काळजी घेतली जाणार आहे. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना राज्य सरकारकडून काही महत्वाच्या सूचना देखील देण्यात आल्याचीही माहिती आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज ४ वाजता या निकालाचं वाचन करणार आहेत. गेल्या दीड वर्षांपासून अत्यंत चर्चेच्या आणि राजकीय वादाच्या ठरलेल्या या मुद्द्यावरील निकालाकडे संपूर्ण राज्याचे आणि देशाचेही लक्ष लागले आहे.

शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात दोन्ही गटांच्या याचिकांवर १४ सप्टेंबर ते २० डिसेंबरपर्यंत विधानसभेच्या अध्यक्षांसमोर मॅरेथॉन सुनावणी झाली होती. आज विधानसभा अध्यक्ष विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये या निकालाचे वाचन करणार आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या ज्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे त्यामध्ये शिंदे गटाच्या 16 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांचा समावेश आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!