Disha Shakti

राजकीय

नगर जिल्हा ‘हाय अलर्ट’वर ; जरांगे, भुजबळांच्या सभांपूर्वीच जिल्हा प्रशासनाकडून जमावबंदी

Spread the love

विशेष प्रतिनिधी /इनयात अत्तार : अयोध्येत प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघालेले मनोज जरांगेचा मुक्काम, मंत्री छगन भुजबळ यांच्या ओबीसी सभेच्या नियोजनासाठी होत असलेल्या बैठका आणि इतर सार्वजिक कार्यक्रमांमुळे प्रशासन अलर्ट मोटवर आले आहे. नगर जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितेसाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.

जिल्हाधिकारी सिद्धाराम सीलामठ यांनी हा आदेश शनिवारी (ता.20) काढला असून, तो दोन फेब्रुवारीपर्यंत लागू राहणार आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1)(3) नुसार हा आदेश लागू राहणार आहे. या आदेशानुसार मिरवणुका काढण्यास आणि पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई असणार आहे. मिरवणुकांसाठी स्थानिक पोलीस प्रशासनाची परवानगी अनिवार्य करण्यात आली आहे.

या आदेशाच्या काळात घातक शस्त्र जवळ बाळगण्यास, नेण्यास मज्जाव असणार आहे. तसेच जाहीरपणे घोषणा, ध्वनीवर्धक तसेच शांतता धोक्यात येईल, असे कृत्य करण्यास मनाई असणार आहे. या आदेशातून पोलीस अधिकारी यांना वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशानुसार शस्त्र बाळगता येणार आहे. प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, धार्मिक मिरवणूका, लग्न समारंभ, लग्नाच्या मिरवणूका हे कार्यक्रम, सभा घेण्यास अथवा मिरवणुका काढण्यास स्थानिक पोलीस अधिकारी यांची रितसर परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना हा आदेश लागून नसणार आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या जमावबंदीच्या आदेशावर सकल मराठा समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सकल मराठा समाजाच्या समन्वय समितीने या आदेशाला आव्हान दिले आहे. आता छाताडावर गोळ्या घातल्या तरी माघार नाही. अंगावर गुलाल घेईपर्यंत कोणताचा आदेश मानणार नाही. पदयात्रेवर अनेक निर्बंध राज्य सरकारने प्रशासनाकडून लादण्यात आले आहेत. तसेच तीन पानी सूचना पत्र पाठवले आहे. त्यात सभा देखील बंदी घातली आहे. परंतु आता माघार नाही. फक्त प्रशासनाने अंतरवली सराटीमध्ये लाठीचार्जचा जो प्रकार केला तो येथे करू नाही, असा इशारा सकल मराठा समाजाच्या समन्वय समितीकडून देण्यात आला आहे.

मंत्री राधाकृष्ण विखे यांनी मनोज जरांगे यांच्याशी शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला होता. माजी मंत्री आमदार बच्चू कडू देखील यांनी प्रयत्न केले. परंतु सरकारडून देण्यात आलेले वचन पूर्ण झालेले नाही. त्यामुळे बच्चू कडू देखील आंदोलनात सहभागी झाले आहे. पदयात्रेत आता 25 किलोमीटरपर्यंत लोकांची रांग आहे.

यावरून हे मराठा वादळ घोंगावत मुंबईत दाखल होणार आहेत. आरक्षणाची लढाई ही शांततेच्या मार्गाने सुरू आहे. आरक्षणाचा विजय मिळेपर्यंत आणि अंगावर गुलाल पडेपर्यंत राज्य सरकारला काय करायचे ते करू द्यात, तोपर्यंत शांततेच्याच मार्ग अवलंबणार असल्याचे सकल मराठा समन्वयक समितीकडून सांगण्यात आले आहे.

पाथर्डीत दोन टन पिठले-भाकरीची तयारी
नगर जिल्ह्यात मनोज जरांगे यांची मराठा आरक्षण पदयात्रा पाथर्डीत रविवारी सकाळी आठ वाजता दाखल होईल. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सभास्थळाची आणि पदयात्रा मार्गाची पाहणी केली. पाथर्डीत वाळुंज,आगसखांड शिवारात ही पदयात्रा येईल. यासाठी सुमारे शंभर एकरच्या परिसरावर जेवणाची सोय करण्यात आली. पाण्याचे टँकर, पत्रावळी, ग्लास सुद्धा सोय करण्यात येत आहे. सुमारे दोन टन पिठले भाकरी जेवणासाठी केले जाणार आहे. तसेच टेम्पोच्या केळी, खिचडी, मसाले भात, लापशी, चपाती,भाकरी, सुकी भाजी,चटणी व ठेचा अशा पद्धतीने जेवणाची व्यवस्था पदयात्रेतील लोकांसाठी करण्यात आली आहे.

पाथर्डी, शेवगाव त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातील शिरूर कासार,आष्टी येथीलही नागरिकांनी या पदयात्रेसाठी आपला सहयोग दिला असून सुमारे दहा हजाराच्या आसपास तरुण स्वयंसेवक या ठिकाणी आपली सेवा देत आहेत. मिडसांगवी ते नगरपर्यंत सुमारे 85 किलोमीटरचा पदयात्रा रस्त्याची पाहणी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व त्यांच्या पथकाने केली.

वाहतुकीत बदल…
नगरहून पाथर्डी मार्गे मराठवाड्याला जाणारी कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक वळविण्यात आली आहे. तर याच महामार्गावरील पाडळसिंगी वरून नगरकडे येणारी वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. या रस्त्यावर असणारी अंतर्गत वाहतूकही स्थानिक पोलिसांनी वळवली आहे.

‘असा’ असेल पोलीस बंदोबस्त
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी 02, पोलीस निरीक्षक 10,सहाय्यक निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक 30 असे अधिकारी असून पोलीस कर्मचारी 250, एसआरपी एक कंपनी (80 कर्माचारी), आरसीपी पोलीस दोन प्लाटून (30 कर्मचारी) असा पोलीस बंदोबस्त असणार आहे. ज्या मार्गावरून ही पदयात्रा जाणार आहे. त्या रस्त्याला मिळणारे छोटे-मोठे रस्ते त्या ठिकाणीही पोलिसांचे पूर्ण नियंत्रण असणार असून त्या ठिकाणी बॅरिकेटचा वापर करण्यात आला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!