श्रीरामपूर प्रतिनिधी / गणेश राशीनकर : काँग्रेस पक्षाच्यावतीने श्रीरामपूरमध्ये मेळावा आयोजिण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये बोलताना आमदार कानडे म्हंटले की ‘काँग्रेस पक्षाने लोकशाही पद्धतीने कारभार करून समतेचा विचार रुजविला. युवकांनी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करून काँग्रेस पक्षाचा विचार सामान्यांपर्यंत पोहोचवून भाजप सरकारचा खरा चेहरा समोर आणावा,’ असे आवाहन आमदार लहू कानडे यांनी केले.
काँग्रेस पक्षाच्यावतीने आमदार कानडे यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात आयोजित श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे बूथ प्रतिनिधी, कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. कानडे म्हणाले, “काँग्रेसने सर्व जाती-धर्मातील लोकांना बरोबर घेऊन देशाचा विकास केला. भाजप सरकारने सत्तेत आल्यापासून हे चक्र उलटे फिरण्यास सुरुवात केली. त्यासाठी संघटितपणे कट करून सतत खोटे सांगून दिशाभूल केली.
राम मंदिराच्या नावावर राजकारण सुरू केले. शेतकऱ्यांच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा होतील, उत्पन्न दुप्पट होईल, असे सांगितले. त्यांच्या अंधभक्तांनी त्याचा खोटा प्रचार केला. परंतु, तसे काही झाले नाही. इथेनॉल उद्योगात 70 हजार कोटीची गुंतवणूक असताना इथेनॉलवर बंदी घालून हा निर्णय पुन्हा बदलण्याची वेळ आली. जनतेकडून वस्तू सेवा कराच्या माध्यमातून पैसा गोळा केला,” असा हल्लाबोल कानडेंनी केला.
तसेच 22 जानेवारीच्या अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर आपणही कार्यकर्त्यांना घेऊन तेथे जाणार असल्याचेही आमदार कानडे यांनी सांगितले. ‘मतदान प्रतिनिधींची जबाबदारी वाढली’ निवडणूक आयोगाने 80 वर्षांपुढील व्यक्तीचे मतदान घरी जाऊन घेण्याचे सुचविले आहे. त्यामुळे मतदान प्रतिनिधींची जबाबदारी वाढली आहे.
काँग्रेस पक्षाने सोशल मीडियावर अधिक भर दिला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यांसारख्या साधनांचा वापर वाढवावा लागणार आहे. तरुणांनी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून काँग्रेस पक्षाचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहाचवावेत, असे आवाहन आमदार लहू कानडे यांनी केले.
युवकांनी भाजपचा खरा चेहरा समोर आणावा ; श्रीरामपूरमधील काँग्रेस पक्ष मेळाव्यात आमदार कानडेंचा हल्लाबोल

0Share
Leave a reply