श्रीरामपूर प्रतिनिधी / इनायत अत्तार : विधानसभा मतदारसंघात आपण पारदर्शकपणे विकास कामे केली. ज्यांनी गरीब शेतकऱ्यांच्या शेती महामंडळाच्या जमिनी हडपल्या, नगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेत घोटाळा केला, समाजसेवेच्या नावाखाली राजकारणाचा धंदा करून जनतेला फसवले, या लोकांनी कटकारस्थान रचून आपली उमेदवारी कापत भलत्याच माणसाला काँग्रेसची उमेदवारी दिली. अशा प्रकारे लबाडी करणाऱ्यांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन आमदार लहू कानडे यांनी केले.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ मतदार संघातील राहुरी तालुक्यातील 32 गावातील देवळालीप्रवरा, राहुरी फॅक्टरी, कोल्हार खुर्द, मुसळवाडी, महाडूक सेंटर, महालगाव, मालुंजे खुर्द, माहेगाव येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते अविनाश आदिक, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष कैलास बोर्डे, विधानसभा समन्वयक किशोर पाटील बकाल, भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, अमृत काका धुमाळ, शहाजी कदम यावेळी उपस्थित होते.
आ. कानडे म्हणाले, बारा वर्षापासून शहरात राहत असताना आपण येथे प्लॉट घेतला नाही की, इमारती बांधल्या नाही. परंतु अनुराधा आदिक नगराध्यक्ष होण्यापूर्वी यांनी जनतेमध्ये जाण्याच्या नावाखाली गोड बोलून प्लॉट हडप केले. शेती महामंडळाच्या वाटप झालेल्या शहराजवळील सुमारे पन्नास, शंभर एकर गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी कोणी खरेदी केल्या, हे जनतेला सांगितले पाहिजे. शहरासाठी आलेली 60 कोटीची भुयारी गटारी योजना प्रत्यक्षात जमीन नसताना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधल्याचे दाखवून कोट्यावधी रुपये हडपले, मतदारांनी अशा घोटाळेबाज लोकांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्यावी.
अविनाश आदिक म्हणाले, आ. कानडे हे पारदर्शक काम करणारे आमदार असून मतदारसंघात त्यांनी कोट्यावधी रुपयांची कामे केली आहेत. परंतु ज्यांना त्या कामातील वाटा मिळाला नाही, त्यांचे लाड पुरविले नाहीत, म्हणून त्यांनी कटकारस्थान करून आ. कानडे यांचे तिकीट कापले. परंतु त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसला प्रामाणिक व कर्तबगार आमदार लाभला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लहू कानडे हेच महायुतीचे उमेदवार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. मतदारांनी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व विकासाची दूरदृष्टी असलेल्या आ. कानडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
सत्यजित कदम म्हणाले, आ. कानडे महायुतीच्या घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत हजारो कार्यकर्त्यांसह सामील झाल्याने श्रीरामपूरची काँग्रेस फुटली आहे. खरी काँग्रेस आ. कानडे यांच्या कामामुळेच जिवंत होती. आता केवळ एका कुटुंबाला मानणारे ठराविक टोळके तेवढे काँग्रेस म्हणून शिल्लक आहे. त्यांचेच ऐकून त्यांचाच असणारा एक माजी आमदार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदेश डावलून बागी उमेदवार म्हणून रिंगणात आहे. महायुतीची मते खाणाऱ्यासाठी काँग्रेसवाल्यांनीच रचलेले हे षडयंत्र असल्याचे ते म्हणाले.
यावेळी अजय खिलारी, सुधीर टिक्कल, राजेंद्र बोर्डे, केदारनाथ चव्हाण, अजित कदम, सचिन सरोदे, बाळासाहेब लोखंडे, सचिन निमसे, ऍड. आप्पासाहेब पवार, वसंत कदम, राहुल महांकाळ, विलास संसारे, बाबासाहेब वाळके, अंबादास इरले, नाना संसारे, किशोर पंडित, रामा कडू, मेजर धनंजय वाळके, अमोल मुसमाडे, बाबा पठारे, रोहित कदम, बाळासाहेब कोल्हापुरे, सचिन निमसे, राजू बोर्डे, योगेश मुसमाडे, संभाजी शिंदे, मनोज भोंगळे, नंदू उल्लारे, ज्ञानदेव देठे, रामभाऊ सोळुंके, डॉ. सर्जेराव सोळुंके, नारायण रिंगे, पंकज आढाव, सरपंच रामकृष्ण पवार, विठ्ठल बोरुडे, बाबासाहेब बोरुडे, रामभाऊ माकोणे, काशिनाथ पवार, आदिनाथ सोळंके, चांगदेव दरेकर, देवराव पवार, सोपान कवडे, रवींद्र पवार, बाळासाहेब घोलवड, पाराजी पवार, भास्कर बोर्डे, उत्तम पवार, संदीप मुंगसे, सुभाष पवार, काका देठे, भाऊसाहेब थेवरकर, अजित धुमाळ, प्रल्हाद धुमाळ, भाऊसाहेब चव्हाण, संजय, सरमाणे, अशोक धुमाळ, दिलीप धुमाळ, बळीराम पावर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a reply