राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ माजी आमदार व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण तिसऱ्या दिवशी (16 एप्रिल 2025) सोडले. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार नीलेश लंके आणि माजी आमदार दादासाहेब कळमकर यांच्या हस्ते लिंबू सरबत देऊन उपोषण सोडण्यात आले. मात्र, आरोपींना तातडीने अटक न झाल्यास हा मुद्दा राज्यव्यापी आंदोलनात रूपांतरित करू, असा इशारा तनपुरे यांनी दिला.
उपोषणादरम्यान तनपुरे यांचे वजन अडीच किलोने कमी झाले, तर वैद्यकीय सल्ल्याने त्यांना सलाइन देण्यात आले. उपोषणकर्ते पप्पू कल्हापुरे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत, “आरोपींना पाठबळ देणारे सत्तेत आहेत, म्हणूनच तपास रखडला आहे. राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर प्रकरणांचा दाखलाही त्यांनी दिला. हे आंदोलन महाराष्ट्रभर पसरवू,” असे ठणकावले.
बाळासाहेब थोरात म्हणाले, “शिवरायांचा अपमान जाणीवपूर्वक केला जात आहे. तनपुरे यांनी तीन दिवस आत्मक्लेष केला. गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी.” खासदार नीलेश लंके यांनी, “21 दिवसांनंतरही आरोपी मोकाट आहेत. शिवरायांच्या नावाने सत्तेत आलेल्यांनी त्वरित कारवाई न केल्यास जेलभरो आंदोलन करू,” असा इशारा दिला.
तनपुरे म्हणाले, “भरदुपारी घडलेल्या या घटनेचा तपास लागत नसल्याने समाजकंटकांचे धैर्य वाढत आहे. शहरात भयमुक्त वातावरण हवे.” उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी राहुरी दिवसभर बंद होती. आंदोलकांनी आरोपीच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. माजी आमदार प्रसाद तनपुरे, शिवसेना जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, रवींद्र मोरे, नंदकुमार तनपुरे, प्रशांत डौले, गणेश आघाव, हर्ष तनपुरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस उपविभागीय अधिकारी बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक नंदकुमार ठेंगे आणि तहसीलदार नामदेव पाटील यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले.
उपोषणकर्त्यांमध्ये प्रशांत डौले, सौरभ उंडे, नंदकुमार तनपुरे, गणेश आघाव, किरण गव्हाणे, पप्पू माळवदे, पप्पू कल्हापुरे, पांडू उदावंत, धनु म्हसे, अशोक कदम यांचाही समावेश होता.
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे तीन दिवसापासून सुरु असलेले उपोषण विरोधी पक्षनेते आंबासाहेब दानवे यांच्या हस्ते सुटले, अंबादास दानवे यांची सत्ताधाऱ्यांवर सडसडून टीका

0Share
Leave a reply