Disha Shakti

Uncategorized

शिर्डी साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय ; काळेंना वर्षातच सोडावे लागले पद

Spread the love

प्रतिनिधी ( रमेश खेमनर ) शिर्डी,दि.13 सप्टेंबर : महाविकास आघाडी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसला आज ता. १३ सप्टेंबर मोठा धक्का बसला आहे. महाआघाडीने नियुक्त केलेले शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. काँग्रेसशी वाटाघाटी करून राष्ट्रवादीने हे देवस्थान मंडळ पदरात पाडून घेतले होते. मात्र, वर्षभराच्या आत या संस्थाचे अध्यक्ष, राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांना पद सोडावे लागले आहे.

महाविकास आघाडीने आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली सोळा सदस्यीय विश्वस्त मंडळ नेमले होते. मात्र, हे विश्वस्त मंडळ नियमाला धरून नाही, ते बरखास्त करण्यात यावे, यासाठी शिर्डी येथील उत्तमराव शेळके यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर आज झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ते विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले.

खंडपीठाने याबाबतचा आदेश देताना नवीन विश्वस्त मंडळ दोन महिन्यांत नेमण्याची सूचनाही राज्य सरकारला केली आहे. एक त्रिस्तरीय समिती दोन महिन्यांत देवस्थानचा कारभार पाहील. त्यामध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा न्यायाधीश, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. या समितीने दैनंदिन कामकाज पाहावे. मात्र, कोणतेही मोठे निर्णय अथवा आर्थिक व्यवहार करू नये, अशी सूचनाही न्यायालयाने केली आहे. याबाबतची माहिती याचिकाकर्त्यांचे वकील अजिंक्य काळे यांनी दिली आहे.

महाविकास आघाडी सरकारने साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी कोपरगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांची निवड केली होती. या पदास राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे. मंडळात माजी आमदार जयंतराव जाधव (नाशिक), अनुराधा आदिक (नगराध्यक्ष, श्रीरामपूर), ॲड. सुहास आहेर (संगमनेर), अविनाश दंडवते (साकुरी), सचिन गुजर (श्रीरामपूर), राहुल कनाल (मुंबई), सुरेश वाबळे (राहुरी), महेंद्र शेळके (शिर्डी), डॉ. एकनाथ गोंदकर (शिर्डी) व शिवाजी गोंदकर (नगराध्यक्ष शिर्डी, पदसिद्ध) व इतर सहा जणांचा समावेश होता. यातील बहुतांश विश्वस्त हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षाशी संबंधित हेाते.

आमदार काळे हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गुडबूकमधील आमदार म्हणून परिचित आहेत. पवार यांनी यापूर्वी त्यांच्याकडे रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविलेली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीने हे देवस्थान मंडळ काँग्रेसकडून वाटाघाटी करून घेतले होते. कारण यापूर्वी हे मंडळ काँग्रेसच्या ताब्यात होते. मात्र, महाविकास आघाडीच्या काळात ते प्रथमच राष्ट्रवादीच्या ताब्यात गेले हेाते. मात्र, वर्षभराच्या आतमध्ये आमदार आशुतोष काळे यांना अध्यक्षपद सोडावे लागले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!