प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोर अजित पवार गटाला थेट ताकीद दिली आहे. “मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, ज्यांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहे त्यांनी माझा फोटो वापरावा, अन्य कोणीही माझा फोटो परवानगीशिवाय वापरू नये” असे आदेश पवारांनी दिले आहेत. दरम्यान अजित पवारांच्या गटाने शरद पवारांचे फोटो वापरलेले आहेत. त्यामुळेच आता थेट मोठ्या पवारांनीच ताकीद दिली आहे.
कार्याध्यक्ष पदाची पक्षाच्या घटनेत नोंदच नाही
राष्ट्रवादीने सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी निवड केली होती. त्यातील कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलांनी अजित पवारांसह शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर नवीन नियुक्त्या जाहीर केल्या. पण विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन्ही कार्याध्यक्षांच्या निवडीची पक्षाच्या घटनेत नोंदच करण्यात आलेली नाही. त्यामुळे कायदेशीर लढाईत या पदाचा फायदा कोणालाच होणार नसल्याचे दिसते.
शिंदे गटाची तातडीची बैठक
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून सत्ताधारी शिवसेना शिंदे गटामध्ये कमालीचं अस्वस्थ वातावरण आहे, याचसंदर्भात आज सायंकाळी 6 वाजता शिक्षणमंत्री दीपक केसरकरांच्या निवासस्थानी तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीमध्ये सर्व आमदार उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे. मुख्यमंत्री बैठकीला उपस्थिती लावणार का याबाबत साशंकता आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना मंत्रिपद दिल्यानं शिंदेगटात अस्वस्थता आहे.
Leave a reply